बिलोली : मांजरा नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करणारे माफिया पुन्हा सक्रीय झाले आहेत. महसूल पथकाने मंगळवारी ( दि. २० ) पहाटे ४ वाजेच्या मांजरा नदी पात्रात कारवाई केली. यावेळी आरोपींनी पळ काढला मात्र पथकाने वाळूने भरलेले ५ ऑटोरिक्षा पकडले. सर्व ऑटोरिक्षा तहसील कार्यालयात लावण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे.
अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडत आहे. यावर कारवाईसाठी तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी विशेष पथकाची नेमणुका केली आहे. या पथकाने १० दिवसांत तब्बल ८ वाहनांवर कारवाई केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाल्याने सर्व प्रशासन या कामात गुंतले आहेत. याचा फायदा घेत काही वाळू माफीयांनी मांजरा नदी पात्रात अवैध उत्खनन सुरु केले होते.
याची माहिती मिळताच तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डॉ.ओमप्रकाश गोंड, पुरवठा अधिकारी उत्तम निलावाड, संगायोचे अनिल परळीकर, तलाठी नागोराव मोताळे, तलाठी पवन ठक्करोड आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली. पथक पात्रात पोहोचताच वाळू माफियांनी तेथून पळ काढला. मात्र पथकाच्या हाती वाळूने भरलेले पाच ऑटोरिक्षा लागले आहेत. हे ऑटोरिक्षा तेलंगणा राज्यातील असून विनाक्रमांकाचे आहेत.