खिचडीत साप प्रकरणी अखेर मुख्याध्यापक निलंबित; स्वयंपाकीन महिलेसही कामावरून केले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:43 PM2019-02-01T13:43:40+5:302019-02-01T13:47:26+5:30

हलगर्जीपणाचा ठपका ठेवत या शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण बडेराव यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले

Head Master suspended in snake cooked in mid day meal case; The woman cook also been reduced to work | खिचडीत साप प्रकरणी अखेर मुख्याध्यापक निलंबित; स्वयंपाकीन महिलेसही कामावरून केले कमी

खिचडीत साप प्रकरणी अखेर मुख्याध्यापक निलंबित; स्वयंपाकीन महिलेसही कामावरून केले कमी

Next
ठळक मुद्देउपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंडेकर यांच्यासह गटशिक्षणाधिकारी रुस्तुम ससाणे यांनी दिली भेट या प्रकरणी पोलिस ठाण्यातही फिर्याद देण्याच्या सूचना

नांदेड : गारगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहाराच्या खिचडीत साप शिजल्याचा प्रकार घडला होता़ या प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून हलगर्जीपणाचा ठपका ठेवत या शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण बडेराव यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे़ याबरोबरच स्वयंपाकीन बाईलाही कामावरून कमी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी बजावले़ 

जिल्हा परिषद गारगव्हाण शाळेत ३० जानेवारी रोजी दुपारी मध्यान्ह भोजनासाठी दिली जाणारी खिचडी शिजविताना उघड्या पात्रामध्ये किचनशेडच्या पत्रावरील साप पडून तो शिजला़ हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली़ याची माहिती विद्यार्थ्यांनी स्वयंपाकीन महिलेला दिल्यामुळे पुढील अनर्थ टळला़ या घटनेनंतर सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात येत होता़ गारगव्हाण येथील पालकांनीही आक्रमक होत गुरुवारी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही़ जोपर्यंत संबंधिताविरूद्ध कारवाई होणार नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला होता. दरम्यान, गुरुवारीच हदगाव पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गारगव्हाण येथे भेट देवून खिचडीचे नमुने तपासणीसाठी घेतले़  दुपारी ४ च्या सुमारास उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंडेकर यांच्यासह गटशिक्षणाधिकारी रुस्तुम ससाणे यांनी शाळेला भेट देवून चौकशी केली़ तसेच पालकांशीही संवाद साधला़

दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी मुख्याध्यापक प्रवीण बडेराव यांना निलंबित करण्याचे आदेश दिले़ याबरोबरच शालेय पोषण आहार बनविणाऱ्या स्वयंपाकीन महिलेसही कामावरून तात्काळ कमी करण्याचे निर्देश दिले़ सदर प्रकरण जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून या प्रकरणी पोलिस ठाण्यातही फिर्याद देण्याच्या सूचना हदगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Head Master suspended in snake cooked in mid day meal case; The woman cook also been reduced to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.