डोंगराळ, दुर्गम भागातही उमटविला आरोग्यसेवेचा ठसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:13 AM2019-05-12T01:13:58+5:302019-05-12T01:14:15+5:30
कंधार तालुका डोंगराळ, दुर्गम भागानी व्यापला आहे. आरोग्य सुविधेचा लाभ घेण्यासाठी जशी ओढाताण होते.तशीच सुविधा देत असताना कसरत करावी लागते. आंबुलगा उपकेंद्रातील आरोग्य सेविका अहिल्या रणखांब यांंनी आरोग्यसेवेचा ठसा उमटविला आहे.
गंगाधर तोगरे
कंधार : कंधार तालुका डोंगराळ, दुर्गम भागानी व्यापला आहे. आरोग्य सुविधेचा लाभ घेण्यासाठी जशी ओढाताण होते.तशीच सुविधा देत असताना कसरत करावी लागते. आंबुलगा उपकेंद्रातील आरोग्य सेविका अहिल्या रणखांब यांंनी आरोग्यसेवेचा ठसा उमटविला आहे. दुर्गम भागातील महिलांसाठी त्यांनी आरोग्यसेवेची घट्ट वीण विणली आहे. आरोग्यसेवेचा त्यांचा नऊ गावचा धावता प्रवास थक्क करणारा असाच आहे.
ग्रामीण भागात दळणवळणाची सुविधा आजही तोकडी आहे. रस्ते, वाहन हा कायम कळीचा मुद्या ठरत आला आहे. रात्री-अपरात्री वाडी-तांड्यावर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर तारांबळ उडते. आरोग्य सुविधा मिळवताना कसरत करावी लागते. गरोदर मातेच्या वेदनेवर औषधोपचार, प्रसूतीची मात्रा देताना उपकेंद्रावर आरोग्यसेविकेची दमछाक होते.
डिप्लोमा काळातील ज्ञानाचा कस लागतो. नातेवाईकांना मानसिक धीर द्यावा लागतो. सामान्य कुटुंबांना मायेचा आधार देऊन कार्यकुशलता सेवेतून सिद्ध करावी लागते. त्यात कंत्राटी आरोग्यसेविका अहिल्या रणखांब यांची सेवा लक्षवेधी ठरली आहे.
आरोग्यसेविका डिप्लोमा पूर्ण करुन त्या २०१० मध्ये आंबुलगा उपकेंद्रात रूजू झाल्या. आंबुलगा, ब्रम्हवाडी, पिंपळ्याचीवाडी, वाखरडवाडी, वाखरड, टोकवाडी, गऊळ, भोजुचीवाडी, फकिरदरावाडी या गावांसाठी आरोग्यसेवा देताना रूग्णांना दिलासा देण्याची किमया साधली. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत ८४ गरोदर महिलांची प्रसूती केली. प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर तपासणी, बाळाचे लसीकरण केले. बाळाला ५ वर्षांपर्यंत सेवा अविरत देण्यात आली. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट सहज पार केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.पी.ढवळे, तालुका पर्यवेक्षक एस. एम. अली, ता.गट नर्सिंग अधिकारी पद्मीनबाई मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.फरनाज जहॉ, डॉ. वेंकटेश आनलोड, आरोग्य सहाय्यिका टी.एम.जोंधळे यांच्या सहकार्याने सेवेसाठी आत्मबल मिळाले. आणि आरोग्यसेवा देऊन रूग्ण व नातेवाईकांना दिलासा देण्यात यश मिळविले.
घरची बेताची आर्थिक परिस्थिती, कुटुंबाची शिक्षणासाठीची प्रेरणा महत्त्वाची ठरली. आर्थिक परिस्थितीचा कधी बाऊ केला नाही. डिप्लोमा करण्यासाठी उसनवारी केली.
शासनाचे मानधन तुटपुंजे
कोणत्याही रूग्ण व नातेवाईकांनी त्रास दिला नाही. उलट मनोबल वाढविले. दुर्गम भागातील रूग्णांना रात्री-अपरात्री सेवा देत असताना आळस केला नाही, अशी भावना अहिल्या रणखांब यांनी व्यक्त केली. परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवत आरोग्य सेवा हीच सर्वोत्कृष्ट सेवा असल्याचे मानून यात दाखल झाले.
शासन तुटपुंजे मानधन देते. तसेच कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देते.वाढती महागाई असल्याने अपुरे मानधन द्यावे व सेवेत कायम केले तर आर्थिक व कौटुंबिक आधार ठरणार आहे. अन्यथा कामे तेच व कामाचा मोबदला कमी असल्याने आरोग्य सेवेतील महत्त्वाचा घटक दुर्लक्षित राहण्याची भीती आहे.
सेवेची आत्मिक प्रबळ इच्छा, परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवत आरोग्यसेवा हीच सर्वोत्कृष्ट सेवा असल्याचे मानून यात दाखल झाले. सामान्य रूग्णांना सेवा देताना आंनद वाटला़ कोणत्याही रूग्ण व नातेवाईकांनी त्रास दिला नाही. उलट मनोबल वाढविले. -अहिल्या रणखांब, परिचारिका, प्रा़आक़ेंद्र आंबुलगा