नांदेड : नांदेड : राज्य शासनाच्यावतीने माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियान जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्हयातील ४ लाख ८८ हजार ८७३ कुटूंबाचे पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, या मध्ये ४३ हजार १६१ जण विविध गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे आढळले आहेत. या रुग्णांवर आता आरोग्य विभागाचे विशेष लक्ष राहणार असल्याचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी शिवशक्ती पवार यांनी सांगितले.
माझे कुटूंब माझी जबाबदारी या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबापर्यंत पोहोचण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न होता. सुमारे २ हजार कर्मचारी तसेच स्वंयसेवकाच्या माध्यमातून १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील २६ लाख ९७ हजार ५३४ लोकसंख्येपर्यंत आरोग्य विभागाला पोहोचता आले. या माध्यमातून उपलब्ध झालेला जिल्ह्यातील नागरिकांचा आरोग्य डाटा पुढील उपाय योजनांसाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे पवार यांनी सांगितले. या सर्वेक्षणातून ४३ हजार १६१ जण विविध गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे आढळले आहे. कोरोना आपत्तीमध्ये आरोग्य विभागाकडे उपलब्ध झालेला हा डाटा अत्यंत महत्वपूर्ण आहे.
या ४३ हजार जणामध्ये काही जण कॅन्सर, ह्दयविकार, पॅरॅलिसीस, दमा, मधुमेह, किडनी, लिव्हर आदी आजाराने त्रस्त असल्याचे पुढे आले. या रुग्णांकडेआता विशेष लक्ष देणे शक्य होणार आहे. याबरोबरच ही आकडेवारी उपलब्ध झाल्याने कोणत्या भागात अथवा कोणत्या प्रकारच्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे हे ही स्पष्ट होईल. तसेच ठराविक आजारासाठी एखाद्या रुग्णालयाची ठराविक भागात गरज आहे का याचीही शासनाला माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानूसार पुढील काळात आरोग्य विषयक योजना राबविणे सोईचे ठरेल. या दृष्टीकोनातूनही या सर्वेक्षणाला महत्व असल्याचे पवार यांनी सांगितले.
सर्वाधिक दुर्धर आजाराचे रुग्ण मुखेड तालुक्यातमाझे कुटूंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणातून ४३ हजार १६१ जण कॅन्सर, किडनी, ह्दविकार, लिव्हर, दमा, मधुमेह आदी जंतुविरहीत आजाराने त्रस्त असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये सर्वाधिक ४ हजार ७१६ रुग्ण मुखेड तालुक्यात आढळले आहेत. तर हदगाव तालुक्यात असे ४ हजार १९१ रुग्ण आहेत. अर्धापूर तालुक्यात १७४९, भोकर १८६७, बिलोली २४८८, देगलूर ३०७१, धर्माबाद १११६, हिमायतनगर १९४३, कंधार ३९६८, किनवट ३६७९, लोहा ३८५७, माहूर १७७०, मुदखेड १६३३, नायगाव ३२३९, नांदेड २४३१ तर उमरी तालुक्यात १५१५ रुग्ण आढळले आहेत.