- दत्तात्रय कांबळे
मुखेड ( जि.नांदेड ) : एका घरातील स्वच्छालयाचा सेफ्टीक टँक स्वच्छ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शहरातील अशोकनगर येथे रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. मारोती रामा चोपवाड ( ३० ) आणि नागेश व्यंकट घुमलवाड ( २५ ) अशी मृतांची नावे आहेत.
अशोकनगर येथील प्रा. टी.वाय. सूर्यवंशी यांच्या घरातील स्वच्छालयाचा सेफ्टीक टँक अनेक वर्ष जुना असल्याने ब्लाॅक झाला होता. यामुळे सूर्यवंशी फुलेनगर येथील पाच कामगारांना सेफ्टीक टँक स्वच्छ करण्याचे काम दिले. रविवारी सायंकाळी ५ वाजता पाचही कामगारांनी काम सुरु केले. प्रथम टँकचा दरवाजा उघडून त्यात पाच लिटर अॅसिड टाकण्यात आले. त्यानंतर राञी ९ वाजेच्या सुमारास आतील घाण काढण्याचे काम सुरु करण्यात आले. बाहेरून काही प्रमाणात घाण काढल्यानंतर हात खोलवर पोहचत नसल्याने मारोती रामा चोपवाड टँकमध्ये उतरला. टँकमध्ये जाताच मारोती तोल जाऊन पडला. अॅसिड टाकल्यामुळे टँकमध्ये गॅस तयार झाला होता. यामुळे मारोतीला गुदमरण्यास सुरुवात झाली. मारोतीचा प्रतिसाद मिळत नसल्याने नागेश व्यंकट घुमलवाड हा त्याला वाचवण्यासाठी आत उतरला. ८ ते १० फुट खोल टँक घाणीने आणि गॅसने भरला होता. यामुळे नागेशसुद्धा गुदमरून अत्यवस्थ झाला.
दोघांकडून काही प्रतिसाद नसल्याने बाहेरील तिघे कामगार, घरमालक व त्यांचा मुलगा, शेजाऱ्यांनी मदत कार्य सुरु केले. सिडी, दोर टाकून आतील दोघांना त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, टँक खोल असल्याने मदत कार्य तोकडे पडले. दोघेही बेशुद्ध पडल्याने त्यांना वाचविण्याचे पर्यंत असफल झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मशिनद्वारे घाण बाहेर काढून टँक खाली करण्यात आले. आज सकाळी ८ वाजता पोलिस कर्मचारी प्रदीप शिंदे, योगेश महेंद्रकरसह कामगार अजय बिडला, यल्लप्पा जाधव यांनी आत उतरून मृतदेह बाहेर काढले. पोलिस निरिक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष केंद्रे, पोलिस उप.नि.पि.एस.कुंभारे, गंगाधर चिंचोरे, गणेश पवार, शिवाजी आडबे यांनी पंचनामा केला.
हेही वाचा - विदारक ! नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका थांबली, अखेर बैलगाडीतून नेला मृतदेह
दोन घरातील कर्ते पुरुष केले दोघांवर सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. मारोती चोपवाड याच्या पश्चात पत्नी, ७ वर्षाचा मुलगा, भाऊ-बहिण असा परिवार आहे. तर नागेश घुमलवाड याच्या पश्चात आई-वडिल, दोन भाऊ-तिन बहिणी असा परिवार आहे. दोघेही मच्छीमार व्यवसाय करत. अधिक पैसे मिळतील या आशेने त्यांनी टँक स्वच्छतेचे काम स्वीकारले. दोन्ही घरातील कर्ते पुरुष गेल्याने कुटंब उघड्यावर आले आहे.