मुखेड, कंधार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद; पिकांचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 06:32 PM2019-10-22T18:32:11+5:302019-10-22T18:32:59+5:30
लोहा, नांदेड, धर्माबाद, नायगाव तालुक्यांनाही झोडपले
मुखेड / कंधार : रविवारी रात्री मुसळधार पावसाने मुखेड व कंधार तालुक्याला झोडपून काढले़ दोन्ही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली़ मुखेडमध्ये ९६ मि़मी़ तर कंधार तालुक्यात ७४ मि़मी़ पावसाची नोंद झाली़
कंधार तालुक्यात सलग चार दिवस पावसाने झोडपून काढले आहे. २१ आॅक्टोबर रोजी धो-धो पाऊस झाला. तालुक्यात सरासरी अतिवृष्टीची (७४.६६ मि.मी.) नोंद झाली. परंतु फुलवळ, पेठवडज, कंधार व कुरूळा महसूल मंडळात सर्वाधिक नोंद झाली. त्यामुळे तालुकाभर झालेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला खरिप हंगाम निसर्गाने हिसकावला आहे अशा भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.
तालुक्यात पावसाने १८ आॅक्टोबरपासून शिरकाव केला आहे. सलग चार दिवस तालुक्यात ठिय्या मांडला आहे. शिवारात कापणी केलेले सोयाबीन, ज्वारीचे प्रचंड नुकसान झाले. आडवी पीके जमीन ओली असल्याने गोळा करून वाळवण्यासाठी उन्हाची तिरीप पडत नाही. त्यामुळे धमक वास येऊन बेभावात विक्री होईल. कापूस उगवलेले बोंड आता गळून जाईल. तर फुटलेले बोंड अतिवृष्टीमुळे लालसर होण्याची शक्यता आहे.
उभ्या ज्वारी व सोयाबीनला धान फुटणार?
सततच्या पावसाने काढणीसाठी आलेल्या ज्वारी व सोयबीन पिकाचीही मोठी नासधूस झाली आहे. या आडव्यासह उभ्या पिकाला धान फुटण्याची भिती वाढली आहे. अतिपावसामुळे पिके जमीनीतून उन्मळून येत असून ते वाळतील की नाही याची प्रचंड भिती शेतकऱ्यांना वाटत आहे. शिवारात सगळीकडे पाणीच पाणी पसरले आहे. सखल भागात पाणी साचून पिके पाण्याखाली आली आहेत. वातावरणात बदल होत नसल्याने पीके हाती येणार नाहीत. हाती आले तरी डागेल, काळे धमक आदीने ग्रासलेले राहतील असे विदारक वास्तव शिवार झाला आहे.
२० रोजी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस २१ सकाळपर्यंत चालू होता. त्या पावसाची कंधार पर्जन्यमापक यंत्रावर ८० मि.मी. पावसाची नोंद झाली . कुरूळा ८०, उस्माननगर ५२, बारूळ ३९, फुलवळ १०७ व पेठवडज ९० मि.मी.ची नोंद झाली. तालुक्यात सरासरी पाऊस ७४.६६ मि.मी झाला. आतापर्यंत तालुक्यात ९७३.५ मि.मी.पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पडलेला पाऊस
नांदेड ४५़१३ मि़मी़, मुदखेड २४़३३ मि़मी़, अर्धापूर १६ मि़मी़, भोकर १६़७५ मि़मी़, उमरी २३ मि़मी़, कंधार ७४़६७ मि़मी़, लोहा ५४़१७ मि़मी़, किनवट ५़७१ मि़मी़, माहूर ४ मि़मी़, हदगाव १०़७१ मि़मी़, हिमायतनगर ३़३३ मि़मी़, देगलूर ३५़१७ मि़मी़, बिलोली ५१़२० मि़मी़, धर्माबाद ४५़३३ मि़मी़, नायगाव ५७़६० मि़मी़, मुखेड ९६ मि़मी़ जिल्ह्यात २१ आॅक्टोबर रोजीच्या नोंदीनुसार ३५़१९ मि़मी़ पाऊस झाला़ जिल्ह्यात आतापर्यंत ९१२़३८ मि़मी़ म्हणजेच सरासरीच्या ९५़४८ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली़