नांदेड : कोरोनाच्या दुसऱ्या तीव्र लाटेनंतर संभाव्य तिसरी लाटही येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनावर प्रभावी असलेल्या लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या जात असल्या तरीही उपचार करणाऱ्यांचेच पूर्णत: लसीकरण झाले नसल्याची बाब पुढे आली आहे.
जिल्ह्यात २७ लाख ७८ हजार ९८४ नागरिकांचे लसीकरण अपेक्षित आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात १९ लाख १२ हजार ३९५ तर नागरी क्षेत्रात ३ लाख ३७ हजार ९०१ नागरिकांचे लसीकरण अपेक्षित आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
लसीकरणाबाबत उदासीनता का?
n लसीकरणाचे महत्त्व जगभरात पटले असले तरीही अद्याप काही नागरिकांच्या मनात लसीकरणाची भीती कायम आहे. त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविले जाणारे संदेशही कारणीभूत ठरत आहेत. किनवटसारख्या दुर्गम भागात लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नाहीत. ही बाब समजण्यासारखी असली तरी शहरी भागातील अनेक नागरिकही अद्याप लसीकरणापासून दूरच आहेत.
n काही वैद्यकीय क्षेत्रातील लोकही लसीकरणाच्या साईड इफेक्ट्सबाबत चर्चा करीत आहेत. त्यामुळे नागरी भागात डाॅक्टरांसारखी सुशिक्षित मंडळीही लसीकरण करून घेत नाहीत. त्यामुळे लसीकरणाची ही उदासीनता आता दूर करावी लागणार आहे.
कोरोना लसीकरण हे सर्वांनाच गरजेचे आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस तत्काळ घेणे गरजेचे आहे. काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसल्याची बाब पुढे येत आहे. अशा कर्मचाऱ्यांना लस घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही लस घेतली नसेल तर प्रशासकीय उपाययोजना केल्या जातील.
- डाॅ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड.