शाळेतील सातवीची विद्यार्थिनी गौरी गोविंद शिंदे हिने घेतलेल्या मुलाखतीत वर्षा ठाकूर यांनी स्वत:ची जडणघडण सांगत तुम्हीही तुमचे व्यक्तिमत्त्व सर्वगुणसंपन्न बनवा, याला परिस्थिती आडवी येत नाही. प्रामाणिकपणा, परिश्रम आणि लक्ष्य ठरवून अभ्यास केल्यास यशाचा मार्ग सापडतो, असे सांगून विद्यार्थ्यांनी बनविलेली हस्तलिखिते पाहून शाळेच्या नवोपक्रमशीलतेचे त्यांनी कौतुक केले. ग्रामविकासासाठी महिलांनी पुढे येण्याचे आवाहनही ठाकूर यांनी केले.
अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रणिता देवरे-चिखलीकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, माजी उपसभापती लक्ष्मण बोडके, गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात प्रणिता देवरे-चिखलीकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमांतून पूरक कृती व चांगल्या गोष्टी केल्यास आयुष्यात प्रगतीच्या वाटा अधिक सोप्या होतात. शाळेच्या सर्व उपक्रमशील शिक्षक व गावकऱ्यांचे कौतुक करून विकासकामासाठी चिखलीकरांचे सदैव सहकार्य राहील, असे सांगितले. माझं गाव - सुंदर गाव उपक्रमात दोन्ही रणरागिणींनी चांगला सुसंवाद साधून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.
प्रारंभी सांजवेळी रांगोळ्यांनी सजवलेल्या प्रसन्न वातावरणात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा यथोचित सत्कार, ग्रामपंचायत अपंग निधीचे नऊ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप, जलजीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळजोडीचे उद्घाटन मान्यवरांनी केले. यशस्वितेसाठी नारायणराव कळकेकर, उमाकांत शिंदे, कामाजी कदम, विठ्ठल सोळंके, देवराव कदम, उत्तमराव शिंदे, गुलाब शिंदे, बालाजी शिंदे, नंदकिशोर शिंदे, आत्माराम राजेगोरे, माधवराव शिंदे, चांदू धुमाळे, तुकाराम सालकमवाड, ग्रामसेवक अभिजित भोसले, शिक्षिका मनीषा पवार, दीपाली सनपूरकर, ज्योती हंबर्डे, आदींनी परिश्रम घेतले. राज्य पुरस्कारप्राप्त पंडित पवळे यांनी प्रास्ताविक, तर उत्तम क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय पांचाळ यांनी आभार मानले.