नांदेड जिल्हा परिषदेत उत्पन्न वाढ,मालमत्तेचा मुद्दा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:20 AM2018-11-28T00:20:21+5:302018-11-28T00:21:54+5:30
या सभेत जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीबरोबरच मालमत्तांचा मुद्दा ऐरणीवर असून याबाबत या बैठकीत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
नांदेड :जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीबरोबरच मालमत्तांचा मुद्दा ऐरणीवर असून याबाबत या बैठकीत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
जिल्हा परिषदेच्या कारभाराला २ वर्षे होत आहेत. मात्र जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासंदर्भात कसलाही ठोस निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे शहरातील विविध भागासह जिल्ह्यातही मोक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेची मालमत्ता असतानाही या जागांचा विकास करण्याकडेही प्रशासनांनी कानाडोळा केलेला आहे. अत्यल्प उत्पन्नामुळेच सेस फंडातून जिल्हा परिषद सदस्यांना अवघा २ कोटी विकास निधी मिळतो. यातून प्रत्येक सदस्याला अवघे ४ ते ५ लाख विकास कामांसाठी उपलब्ध होतात. जिल्हा परिषदेने स्वत:चे उत्पन्न वाढविल्यास विकास कामांनाही गती मिळू शकते. नांदेड उत्तरमधील तरोडा नाका येथील ३ एकर २० गुंठे भूखंडाचा प्रश्नही वादात आहे. या जागेसह मल्टीपर्पज येथील जागेच्या विकासाचा पर्यायही उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेसमोर आहे. दरम्यान, हा विषय ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला. गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये या अनुषंगाने चर्चाही करण्यात आली असून शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या संबंधी चर्चा होऊन ठोस निर्णय होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा परिषदेच्या सुत्रांनी सांगितले.