वडगाव, पिंपळगाव, खरटवाडी, हदगाव, तामसा, म्हाटाळा, चोरंबा, हडसनी, लोहा, वारकवाडी अशा अनेक रोपवनात मागील ३० वर्षापासून ज्येष्ठ सेवा कामगार या वनपरिक्षेत्र विभागात कार्यरत आहेत. या वन विभागात आयुष्यातील ३०-३५ वर्ष घालवलेल्या ज्येष्ठ कामगारांना मागील ९ महिन्यांपासून काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. ५ ऑगस्ट २०२० चे संदर्भीय शासकीय पत्रकाप्रमाणे वनीकरण विभागातील रोजंदारी कामगारांची किमान वेतन विशेष भत्यासह दरवाढ जाहीर झाली. त्यानुसार ३७७ रुपये ५० पैसे एवढे देण्याचे नियोजित केले आहे. मात्र या वेतनाच्या मोहापायी किंवा इतर कारणासाठी या विभागाच्या वतीने सेवा ज्येष्ठ कामगारांना कमी करण्यात आले व त्या कर्मचाऱ्यांच्या जागी २०० रुपये घेऊन काम करणाऱ्या कामगारांना घेण्यात आले. या कामगारांत एकाच घरचे तीन-चार माणसे व सेवानिवृत्तीनंतरही या कामगारांत काम करीत असल्याचे ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी सांगितले. नवीन कामगारांच्या वेतानविषयी येथील संबंधित अधिकाऱ्यास विचारणा केली असता ते सांगतात, फॉरेस्ट गार्ड स्वतःच्या खिशातून त्या कामगारांना पैसे देतात. पण गार्ड लोक स्वतःच्या खिशातून पैसे का देत असतील असा कामगारांत संभ्रम तयार होताना दिसतो.
यापूर्वी १० फेब्रु २०२० रोजी असेच बेमुदत धरणे देण्यात आले होते. मात्र वरिष्ठ कार्यालयाच्या कामावर घेण्याच्या आश्वासनामुळे धरणे मागे घेण्यात आले होते. मात्र वरिष्ठ मुख्य कार्यालयीन अधिकाऱ्याच्यावतीने आदेशाची पायमल्ली व फसवेगिरी होत असल्याचे पत्रकाद्वारे ज्येष्ठ कामगारांकडून कळवण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सेवा कामगारांत बाबू चव्हाण, माणिक जाधव, मोहन भिसे, नंदाबाई शिंदे, वामन कुलदीपकर, जाईबाई चव्हाण, शेरसिंग जाधव व इतर सर्व ज्येष्ठ कामगार या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.