International Yoga Day: नांदेडकरांनी केले योगातील सहभागाचे रेकॉर्ड!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 03:46 AM2019-06-22T03:46:36+5:302019-06-22T03:47:07+5:30
‘गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र : मुख्यमंत्री, रामदेव बाबांचा सहभाग
नांदेड : आंतरराष्ट्रीय योग दिनीनिमित्त शुक्रवारी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय योग शिबिराच्या निमित्ताने अवघी नांदेड नगरी योगमय झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरु स्वामी रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिरात सुमारे लाखभर विद्यार्थी-नागरिकांनी सहभाग नोंदविला. या शिबिराने ‘गोल्डन बुक आॅफ रेकॉर्ड’चे प्रमाणपत्रही मिळविले. योगाच्या माध्यमातून आपले जीवन कायमस्वरुपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करू या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. तसेच शरीर व मन निरोगी राहिल्याने जीवनमानातही वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योगासने करुन आपले जीवन आरोग्यदायी व सुखकर बनविण्याचे आवाहन रामदेवबाबा यांनी केले. यावेळी आयुष विभागाने तयार केलेल्या ‘पवनी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
जागतिक विक्रम
एकाचवेळी एकाच ठिकाणी ९१ हजार ३२३ लोकांनी योगासने करण्याचा पूर्वीचा जागतिक विक्रम नांदेडमधील राज्यस्तरीय शिबिराने मोडला. नांदेडमध्ये एक लाख दहा हजारापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी रामदेवबाबा यांनी योग विद्येचे प्रशिक्षण दिले. गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनीष बिष्णोई यांनी ड्रोनद्वारे प्राथमिक गणना करून ही माहिती पुरविली.
गडकरींनीही केला योगा
नागपूर महापालिका आणि नेहरू युवा केंद्र संघटनेतर्फे यशवंत स्टेडियमवर सामुहिक योगाभ्यास शिबिर पार पडले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भ्रमरी प्राणायाम, अनुलोम विलोम, पद्मासन व विविध योगाची आसने केली. ओंकाराचा गजर केला आणि सामूहिक शांतीमंत्रसुद्धा म्हटला.