नांदेड : चौदाव्या वित्त आयोगातून दिवाबत्ती उपक्रमांतर्गत एलईडी दिवे लावण्याची योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे पुढे आले आहे़ जिल्ह्यातील १३०९ पैकी ७६ ग्रामपंचायतींनी योजना राबविण्यास दिरंगाई केली़ याबरोबरच त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितताही आढळून आल्याने या सर्व ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत़
जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागात विविध योजना राबविण्यात येतात़ मात्र काही ग्रामपंचायती निधी उचलूनही योजनांची अंमलबजावणी करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे़ अशा ग्रामपंचायतीवर यापुर्वीही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे़ मात्र त्यानंतरही योजनांची कार्यवाही योग्यरितीने होत नसल्याचे या प्रकारातून पुन्हा समोर आले आहे़ दिवाबत्ती उपक्रमांतर्गत गावातील विद्युत खांबावर एलईडी बल्ब बसविण्याची योजना जिल्ह्यातील १३०९ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येत आहे़ या सर्व ग्रामपंचायतींच्या कामांचा आढावा घेतला असता यातील तब्बल ७६ ग्रामपंचायतींनी योजनेची अंमलबजावणी करताना अनियमितता केल्याचे निदर्शनास आले़ याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणच्या ७६ ग्रामसेवकांना पंचायत विभागाने बुधवारी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत़ ग्रामसेवकांनी नोटीसीचे उत्तर तातडीने द्यायचे असून खुलासे समाधानकारक न आढळल्यास सदर ग्रामसेवकांना विभागीय चौकशीला सामोरे जावे लागेल असा ईशाराही पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही़आरक़ोंडेकर यांनी दिला आहे़
दरम्यान, मागील काही दिवसापासून जिल्हा परिषदेत हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच कामकाजात अनियमितता करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारलेला आहे़ मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दौऱ्यात गैरहजर राहिल्या प्रकरणी दोन ग्रामसेवकावर कारवाई करण्यात आली आहे़ याबरोबरच माहूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस़एम़ तेलतुंबडे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़ पावडेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस़एफक़ानोडे यांच्यावर कारभारात अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे़ याबरोबरच वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसवित पिया सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अभिलेखे अद्ययावत करण्यात दिरंगाई केल्या प्रकरणी कानोडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे़ वरिष्ठांनी वारंवार आदेश देवूनही कानोडे त्याकडे कानाडोळा करीत असल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे़ याबरोबरच वाजेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस़एस़बोधीकर हे मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या दौऱ्यावेळी गैरहजर होते़ त्यामुळे त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली़
दरम्यान, माहूर पंचायत समितीचे विस्तारअधिकारी तेलतुंबडे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़ नाईक तांडा येथे प्रशासक म्हणून कार्यरत असताना बीआरजीएफ योजनेअंतर्गत चौकशीकामी अभिलेखे उपलब्ध करून न देणे, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य नसताना विजय जाधव यांनी ठराव घेवून नेमणूक करणे, अपूर्ण शौचालय बांधकामाबाबत वारंवार मागणी करूनही रेकॉर्ड उपलब्ध करून न देणे आदी ठपके तेलतुंबडे यांच्यावर ठेवण्यात आले असून, माहूर गटविकास अधिकारी यांच्या अहवलानूसार तेलतुंबडे यांना निलंबित करण्यात आले आहे़ दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यातील सामुदायिक शौचालयांची दुरावस्था कायमपाणंदमुक्त अभियानानंतर आता स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय या उपक्रमास राज्य शासनाने सुरुवात केली आहे़ या अंतर्गत ३१ डिसेंबरपूर्वी सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, सौंदर्यीकरण आणि देखभाल व्यवस्था या बाबींवर काम करण्यात येणार आहे़ या अभियानात यशस्वी ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना पारितोषिके देवून गौरविण्यात येणार असले तरी जिल्ह्यातील स्वच्छता अभियानाचा अनेक ठिकाणी बोऱ्या वाजल्याचे चित्र आहे़ विशेष म्हणजे ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या सामुदायिक शौचालयांचीही दुरावस्था झाल्याचे चित्र असून, अनेक ठिकाणी शौचालयांचा वापरही केला जात नसल्याचे दिसून येते़