पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून मराठवाड्याची पाणी तूट भरून काढावी, अशी मागणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मराठवाड्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची, तसेच महत्त्वाकांक्षी लेंडी प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावा, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीवरदेखील उद्धव ठाकरे व जयंत पाटील यांनी अनुकूलता दर्शविली आहे.
मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्पांच्या अनेक अडचणींवर यावेळी चर्चा झाली. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आंतरराज्य स्तरावर काही अडीअडचणी येत असतील तर संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोलेन, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. त्यामुळे बाभळी बंधाऱ्याच्या प्रश्नावर आता स्वतः मुख्यमंत्री हस्तक्षेप करून तेलंगणा राज्याशी बोलणी करणार असल्याचे स्पष्ट आहे.
त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांबाबतही यावेळी चर्चा झाली.