दिशा बैठकीत बहुचर्चित तरोडा अतिक्रमणासह नांदेड-लातूर रस्त्यावरील खड्डयांचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:19 AM2021-09-19T04:19:31+5:302021-09-19T04:19:31+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी खा. चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करीत असताना ...
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी खा. चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करीत असताना जिल्हा परिषदेच्या तरोडा भागातील जागेवरील अतिक्रमणाचा विषय समोर आला. यावर खा. चिखलीकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत, न्यायप्रविष्ट असताना यावर अतिक्रमण कसे वाढत आहे. अनेकवेळा जि. प.च्या सभागृहात हा विषय गाजला होता. तोच विषय पुन्हा एकदा दिशा समितीच्या बैठकीत गाजला. अतिक्रमण तत्काळ काढावेत, अन्यथा त्यांच्या विरोधात प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, असा इशारा खा. चिखलीकर यांनी दिला. त्याचबरोबर नांदेड-लातूर महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे हे येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बुजवावेत. दि. ३० रोजी मी स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सोबत घेऊन पाहणी दौरा करीन, असे ते म्हणाले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाची कामे चालू आहेत. काही ठिकाणी ते काम थांबविण्यात आले आहे. हे काम का थांबविले, त्याची चौकशी करावी. काही कारण नसताना ही कामे थांबली असतील तर दोषींवर कारवाई करावी, असा इशारा त्यांनी दिला. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले.
जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काही ठिकाणी कामे अर्धवट असल्याने लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना खा. चिखलीकरांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागात वीज वितरणच्या तक्रारी वाढल्या असून काही ठिकाणी डी.पी. उपलब्ध नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण भागातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्या. यासह अन्य विषयांवर दिशा समितीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला आ. राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार, आ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सीईओ वर्षा ठाकूर, आयुक्त अनिल लहाने, दिशा समितीचे सदस्य अनिल पाटील बोरगावकर, आदी उपस्थित होते.