भोकर (जि़नांदेड) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांनी स्वत:ला व इतरांना वाचविण्यासाठी लॉकडाऊन काळात घरात बसावे व आवश्यक कामाकरिता घराबाहेर निघाल्यास मास्कशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हा सत्र न्यायाधीश एम.एस. शेख यांनी बुधवारी आॅटोतून फिरुन ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती केली.
विधि सेवेसोबत विविध सामाजिक कार्यातही वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करणारे येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख हे सध्या कोरोनासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीतही स्वस्थ न बसता सामाजिक दायित्व समजून मौलिक कार्य करीत आहेत. लॉकडाऊनदरम्यान अडकून पडलेल्या अनेक मजूर कुटुंबांना दिलासा देण्यासाठी विधि सेवा समितीच्या माध्यमातून पुढाकार घेत श्री रेणुकादेवी संस्थान माहूरमार्फत अन्नधान्य वाटप केले आहे. तसेच पालिका कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले आहे.
आरोग्याच्या दृष्टीने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तालुका विधि सेवा समिती व जिल्हा न्यायालयातर्फे जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी जनजागृती केली. ते स्वत: एका आॅॅटोत बसून शहरातील रस्त्यावर व चौकांमध्ये हाताात माईक घेऊन शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा, मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, साबणाने हात स्वच्छ धुवा असे आवाहन केले. यावेळी दिवाणी न्यायाधीश एम. पी. पांडे व पोलीस निरीक्षक विकास पाटील, न्यायालयीन कर्मचारी व्ही.व्ही. कृष्णावाड, पालिका कर्मचारी दिलीप वाघमारे उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य पाहून असाधारण पदावरील न्यायाधीश महोदय रस्त्यावर उतरून अशाप्रकारे जनजागृती केल्याचा अनुभव शहरवासियांनी प्रथमच घेतला .