कंधारच्या जगतुंग समुद्राचे सौंदर्य वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:07 AM2019-03-14T00:07:52+5:302019-03-14T00:08:54+5:30
राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्राचे सौंदर्य कमी अन् समस्या अधिक अशी अवस्था झाली. ‘लोकमत’ने गत दीड दशकांत हा ऐतिहासिक जलस्थापत्य नमुना केंद्रस्थानी आणत लक्ष वेधले.
कंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्राचे सौंदर्य कमी अन् समस्या अधिक अशी अवस्था झाली. ‘लोकमत’ने गत दीड दशकांत हा ऐतिहासिक जलस्थापत्य नमुना केंद्रस्थानी आणत लक्ष वेधले. झाडेझुडपे वाढली, गटार झाले. शासन, पुरातत्त्व विभागाचे याकडे लक्ष वेधावे यासाठी सतत प्रयत्न केले. अखेर दक्षिण-उत्तर असे जलयुक्त शिवार योजनेतून विविध दुरूस्ती कामाने वेग घेतला. सौंदर्यात भर पडेल असे नागरिक, इतिहासप्रेमी, पर्यटकांतून बोलले जात आहे.
राष्ट्रकुटकालीन जगतुंग समुद्र राजा कृष्ण (पहिला) यांनी बांधला. कृष्ण (तिसरा) यांनी या समुद्राची पुनर्बांधणी केली. या समुद्राचा बांध ९०० मीटर लांबीचा व ६ मीटर रूंदीचा आहे. वैशिष्ट्यपूर्ण कुंड, घाट, मोठ्या श्रृखंला, पाण्याचे नियंत्रण करणारे तंत्र आदीमुळे जलव्यवस्थापनाचा हा अतिशय उत्तम नमुना सर्वांचे लक्ष वेधतो. आजही हा समुद्र सुस्थितीत आहे. परंतु, याकडे म्हणावे तसे लक्ष व देखभाल केली जात नाही. त्यामुळे झाडेझुडपे वाढलेली, गटाराचे पाणी शहरातील अर्ध्या भागाचे व नवरंगपुरा गावाचे समुद्रात येते. एवढेच काय मोकळ्या जागेचा आडोसा पाहून शौचालयासाठी वापर केला जातो.
पर्यटन विकासासाठी निधी मंजूर झाला. निधीतून अनेक कामे झाली. तसेच अनेक कामे अपूर्ण आहेत. याविषयी एप्रिल २०१८ मध्ये ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. मे २०१८ मध्ये ‘कामदेव मंदिर वास्तुला समस्याचे ग्रहण’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले. गेल्या अनेक वर्षांपासून जगतुंग समुद्राचा प्रश्न ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला आहे. आता जलयुक्त शिवार योजनेतून जगतुंग समुद्राची दुरूस्ती केली जात आहे.
जि.प.लघु पाटबंधारे विभागाने आराखड्यात प्रस्तावित केले. तांत्रिक मंजुरीनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. सुमारे ८ लाख १४ हजारांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. बांधाच्या दक्षिण-उत्तर असलेल्या भागातील झाडे-झुडपे तोडणे, मातीकाम, बांधाला नवीन जुन्या दगडाचा वापर करून पिचींग करणे, सांडवा कोपिंग कॉक्रीट करणे आदी कामांचा त्यात समावेश आहे. गत काही आठवड्यांत मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे तोडण्यात आली. पिचींगचे काम वेगात चालू झाले आहे. उपअभियंता एकनाथ कारलेकर, कनिष्ठ अभियंता एस.पी.केंद्रे हे कामे पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ऐतिहासिक जगतुंग समुद्र दुरूस्ती कामातून सौंदर्यात नक्कीच भर पडणार आहे.
८ लाख १४ हजारांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी
जि.प.लघु पाटबंधारे विभागाने प्रस्तावित केलेला आराखडा तांत्रिक मंजुरीनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता़ ८ लाख १४ हजारांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी मिळाली.त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. बांधाच्या दक्षिण-उत्तर असलेल्या भागातील झाडेझुडपे तोडणे, मातीकाम, बांधाला नवीन जुन्या दगडाचा वापर करून पिचींग करणे, सांडवा कोपिंग कॉक्रीट करणे आदी कामांचा त्यात समावेश आहे.