"दहा लाख दे; नाहीतर मुलाचा गेम करतो"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 02:48 AM2020-10-07T02:48:21+5:302020-10-07T02:48:34+5:30
नांदेडकर हैराण; गुन्हेगार टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
नांदेड : शहरात रिंदा गँगच्या दहशतीला बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध बसलेला असताना मिसरूड न फुटलेल्या तरुणांच्या टोळ्यांनी नांदेडकरांना हैराण केले आहे. त्यात विक्की चव्हाण हत्या प्रकरणात फरार असलेल्या बिगानिया या टोळीची वसुली मात्र सुरूच आहे. नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाºयाला दहा लाखांच्या खंडणीसाठी फोन करण्यात आला होता. खंडणी न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे व्यापारी आणि त्याचे कुटुुंबीय भीतीच्या सावटाखाली आहेत.
शहरात कुख्यात रिंदा गँगकडून अनेकांना खंडणीसाठी फोन करण्यात आले. त्यात डॉक्टर, व्यावसायिक, बिल्डर यासह अनेक श्रीमंतांचा समावेश होता. खंडणीसाठी नकार देणाऱ्यांवर गोळीबारही करण्यात आला होता. त्यामुळे नांदेडात रिंदाची दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी जवळपास ६० हून अधिक जणांना पकडले. त्यानंतर या प्रकाराला बराच आळा बसला. परंतु रिंदाच्या नावाने काहींनी पुन्हा हा उद्योग सुरूकेल्याचे दिसून येत आहे.