नांदेड शहरातील रूग्णसंख्या मार्चपासून झपाट्याने वाढू लागल्याने नांदेडकरांची चिंता वाढली होती. त्यात एप्रिल महिन्यात दररोज अडीच हजाराहून अधिक रूग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन करण्यात आला. त्याचा परिणाम मे महिन्यात दिसून आला. आजघडीला दररोज दोनशेच्या आसपास रूग्ण आढळत आहेत. त्यातही रूग्णालयात अथवा कोरोना तपासणी केंद्रावर जावून तपासणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. परंतु, महापालिका प्रशासनाने वेगवेगळी पथके तयार करून शहरात ठिकठिकाणी रिकामटेकड्या नागरिकांची तपासणी करण्याचे काम सुरू केले. तसेच दुकानदारांचीही तपासणी करण्यात आली. या सर्व पथकांचे नियोजन डॉ.सचिन सिंघल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यांच्या नियोजनानूसार शहरात जवळपास २३ ठिकाणी तपासणी केली जात आहे. आजघडील दिवसभरात बाहेर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे स्वॅब घेतले जात आहेत. त्यात काही जणांची आरटीपीसीआर तर काही जणांची ॲन्टीजेन तपासणी केली जात आहे. १८ मेपासून चार दिवसात रस्त्यावर फिरणाऱ्या जवळपास चार हजार जणांची तपासणी केली. त्यापैकी अडीच हजार जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ५६ जण पॉझिटिव्ह आले. तर दिड हजार जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तसेच ८५१ जणांची ॲन्टीजेन टेस्ट केली असून त्यापैकी ६ जण पॉझिटिव्ह आले. दरम्यान, २२ मे रोजी रस्त्यावर फिरणाऱ्या तब्बल दिड हजार जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
शहरात २३ ठिकाणी तपासणी
नांदेड शहरात तपासणीचे झोननिहाय नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ.सचिन सिंघल यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर, आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रूग्ण तपासणीचे काम सुरू आहे. शहरात पंधरा ठिकाणी तसेच प्रत्येक झोनला एक आणि फिरते पथक असे एकूण २३ पथकाच्या माध्यमातून कोरोना टेस्टींगचे काम सुरू आहे. रस्त्यावरील तपासणीत वाढ केली असली तरी तपासणी केंद्रावर जावून तपासणी करणाऱ्यांची संख्या घटली आहे.
फिरणाऱ्यांची कारणे तिच, कोणाचा दवाखाना तर कोणाचा किराणा
घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची कारणे ठरलेली आहेत. अनेकांकडून दवाखान्याची कारणे दिली जातात तर काही जणांकडून किराणा, भाजीपाला अथवा नातेवाईकांना दवाखान्यात डब्बा देण्यासाठी बाहेर पडलो, अशी तिच ती कारणे दिली जात आहेत. परिणामी रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास तयार नाही. त्यात राजकीय हस्तक्षेपामुळे पाेलिसांनीही हात वर केल्याचे दिसून येत आहे. पूर्वीप्रमाणे पोलिसही कठोर कारवाई करत नसल्याने रिकामटेकड्यांचे फावत आहे.