कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्रतिष्ठाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली. तसेच शनिवार आणि रविवार कडकडीत बंद ठेवण्यात यावा, असे आदेश काढले होते. जिल्ह्यात सुरुवातीचे काही दिवस नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. आता मात्र कारवाई करणाऱ्या पथकाकडूनही कानाडोळा करण्यात येत असल्यामुळे चार वाजल्यानंतरही बाजारपेठ अर्धे शटर उघडे ठेवून सुरूच आहे. अशाप्रकारे लपून-छपून व्यवसाय करण्यापेक्षा निर्बंध उठवावेत, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. जेणेकरून खरेदीसाठी नागरिकांची एकाचवेळी गर्दी होणार नाही. तसेच व्यापाऱ्यांचेही नुकसान होणार नाही. परंतु त्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा तिसरी लाट आल्यास आणखी लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याची भीतीही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
ठरलेल्या वेळेत ग्राहकांनी यावे
सध्या सुरू असलेले निर्बंध उठविल्यास धोका होऊ शकतो. कारण पूर्वीच्या अनुभवाप्रमाणे नागरिक नियमांच्याबाबतीत बेफिकीर आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढू शकतो. सध्या सायंकाळी चार वाजेपर्यंतची परवानगी आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्या वेळेपर्यंत येऊन खरेदी करणे अपेक्षित आहे, असेही अनधिकृतपणे बरीच मार्केट सुरूच आहेत. - हर्षद शहा, मर्चंट असोसिएशन अध्यक्ष
निर्बंध उठविणे गरजेचे
प्रशासनाने सध्याचे निर्बंध उठविण्याची गरज आहे. कोरोनामुळे सराफासह इतर व्यापारी देशोधडीला लागले आहेत. परंतु निर्बंध उठविताना नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. शासन लोकांचे जीव वाचावेत म्हणून धडपड करीत आहे. परंतु नागरिक मात्र बिनधास्त आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. - सुधाकर टाक, सराफा असोसिएशन अध्यक्ष