नांदेड : उदगीर शहरासाठी लोहा तालुक्यातील लिंबोटी धरणाहून मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत लिंबोटी धरणस्थळीच बैठक घेवून तोडगा काढण्यात येणार असल्याचे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी शनिवारी नांदेडमध्ये सांगितले़
लिंबोटी धरणाहून उदगीरला पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास १०८ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे़ कामाचे आदेश नोव्हेंबर २०१७ मध्ये झाले होेते़ उदगीर ते लिंबोटी धरण असे जवळपास ४६ कि़मी़ अंतरात ४०० एम़एम़ व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे़ उदगीर तालुक्यात काम सुरू असताना लोहा तालुक्यातून पाणीपुरवठा योजनेच्या उद्भव विहिरीच्या बाजूचे काम थांबवण्यात आले होते़ जवळपास वर्षापासून हे काम बंद आहे़ नांदेडचे खा़प्रताप पाटील चिखलीकर यांनी हे काम बंद केले होते़ परंतु पिण्याच्या पाण्याचा विषय लक्षात घेता हे काम सुरू ठेवणे आवश्यक असल्याची बाब खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर आता या योजनेसंदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे़ ही बैठक थेट लिंबोटी धरणस्थळीच होणार असल्याचे चिखलीकर यांनी सांगितले़
लोहा तालुक्यातील लिंबोटी धरणातून उदगीरला पाणी दिल्यास लोहा-कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही़ ही बाब लक्षात घेवून काम थांबवले होते़ लोहा-कंधार तालुक्यातील जनतेनेही या योजनेला विरोध केला होता़ मात्र आता या प्रश्नावर तोडगा काढण्यात येणार आहे़ लिंबोटी धरणावर लवकरच होणाऱ्या बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह नांदेडचे खा़चिखलीकर, उदगीरच्या आमदारांचीही उपस्थिती राहणार आहे़ या बैठकीत नेमका तोडगा काय निघतो याकडे लक्ष लागले आहे़.