लोहा नगर परिषद भाजपकडे; नगराध्यक्ष पदासह १३ जागांवर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:44 PM2018-12-10T12:44:37+5:302018-12-10T12:46:08+5:30
कॉंग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.
नांदेड : कॉंग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या लोहा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासह 17 पैकी 13 जागांवर यश मिळवले तर कॉंग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.
लोहा नगर परिषदेच्या17 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी 28 मतदान केंद्रावरून आठ प्रभागात रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जवळपास 81 टक्क्याहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी लोहा तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच भाजप उमेदवार आघाडीवर होते.
सकाळी ११.३० वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाले. भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सावकार यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल 4 हजार मतांनी पराभव केला. त्याचबरोबर 17 पैकी 13 जागा मिळवीत भाजपने लोहा नगरपालिकेत एकहाती सत्ता मिळविली.विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
चिखलीकरांनी मारली बाजी
जेमतेम वर्षभरावर येवुन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस आणि भाजपाकडून नगर परिषदेची निवड प्रतिष्ठेची करण्यात आली होती. आमदार प्रताप पाटील चिखलिकर, आ. अमरनाथ राजुरकर व माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाचा या निवडणुकीत कस लागला. मात्र, यात चिखलीकर यांनी बाजी मारली.