नांदेड : सरते २०१७ हे वर्ष राजकीय पातळीवर लक्षवेधी ठरले. याच वर्षात राज्याचे लक्ष लागलेली नांदेड महानगरपालिका निवडणूक झाली. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवित काँग्रेसने नांदेड जिल्ह्यावर असलेले आपले वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित असल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे, वर्षाच्या अखेरच्या महिन्यात काँग्रेस नेते खा. अशोकराव चव्हाण यांच्याबद्दलची विशेष चौकशीची परवानगी उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविल्याने खा. चव्हाण यांच्यासह जिल्हा काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
आॅक्टोबरमध्ये नांदेड महानगरपालिकेचा फड रंगला. ही निवडणूक भाजपाने गांभीर्याने घेवून परिवर्तन घडविण्याचा नारा दिल्याने काँग्रेसचा गड असलेल्या महानगरपालिकेत काय होते? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् मंत्र्यांची फौज तर शिवसेनेकडूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे प्रमुख नेते मैदानात उतरल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या होत्या़ मात्र नांदेडचा हा गड काँग्रेसने एकहाती जिंकून सर्वच पक्षांना मोठी चपराक दिली. या निवडणुकीत एमआयएमचाही दारुण पराभव झाला. ज्या नांदेडमध्ये घवघवीत यश घेवून एमआयएमचा घोडा राज्याच्या विविध भागात चौफेर उधळला होता. त्यालाही नांदेडमध्येच लगाम घालण्यात महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसला यश आले.
शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठीही हे वर्ष तसे निराशाजनकच ठरले. शहरात आमदार असतानाही शिवसेनेला महानगरपालिकेत अवघी एक जागा मिळाली तर राष्ट्रवादीचे खातेही उघडले नाही. एकूणच महापालिका निवडणुकीने नांदेडमधील काँग्रेसच्या वर्चस्वाला एकप्रकारे बळकटी दिल्याचे दिसून आले. तर २०१७ या वर्षाने राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही धोक्याचा इशारा दिल्याचे दिसून येते. मनपानंतर किनवट पालिका निवडणुकीत भाजपाने आपला झेंडा फडकविला. काँग्रेस, राष्ट्रवादीमधील मतविभाजनाचा नेमका फायदा येथे भाजपाला उठविता आला.
किनवट पालिका निवडणुकीतील हा विजय जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी उमेद वाढविणारा ठरला. मात्र किनवट पालिका निवडणुकीनंतर केवळ मतविभाजनामुळे पराभव पत्करावा लागल्याचे लक्षात आल्याने नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित आले आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा आघाडीचे पर्व सुरू झाल्याचे संकेत मिळाले. या आघाडीमुळेच जिल्हा बँकेच्या सत्तेतून भाजपाला पायउतार व्हावे लागले.