- अनुराग पोवळे
नांदेड : जिल्ह्यातील नऊ विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी तीन दिवसांपासून सुरु असून पदयात्रा, कॉर्नर बैठका आणि मतदारांच्या थेट भेटी उमेदवारांकडून घेतल्या जात आहेत. या निवडणुकीत महिला मतदारांची निर्णायक भूमिका राहणार असून तब्बल १२ लाख २४ हजार महिला मतदार या नऊ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी निवडण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत.
जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या २५ लाख ४२ हजार ४५० इतकी आहे. त्यात सर्वाधिक मतदार हे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात आहेत. येथे ३ लाख ११ हजार ९६८ मतदार आहेत. त्यात महिला मतदारांची संख्या १ लाख ५० हजार २६५ इतकी आहे. किनवट मतदारसंघात सर्वात कमी १ लाख २५ हजार ६८२ महिला मतदार आहेत. या ठिकाणी १ लाख ३३ हजार ५८२ पुरुष मतदार आहेत. हदगावमध्येही महिला मतदारांचे प्रमाण उल्लेखणीय आहे. येथे १ लाख ३२ हजार ८१० महिला मतदार आहेत.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघातही २ लाख ९१ हजार ४७४ एकूण मतदानापैकी १ लाख ४० हजार ९८१ महिला मतदार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रंगतदार सामना ठरत असलेल्या नांदेड दक्षिणमध्येही २ लाख ८४ हजार ११४ एकूण मतदारामध्ये १ लाख ३७ हजार १२७ तर १ लाख ४६ हजार ९८७ महिला मतदार आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या भोकर मतदारसंघातही १ लाख ३४ हजार ७३६ महिला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नायगाव मतदारसंघात १ लाख ३६ हजार ४०८, लोहा मतदारसंघात १ लाख २१ हजार ७५८ आणि मुखेड मतदारसंघात १ लाख ३४ हजार १६९ महिला मतदार आहेत.
जिल्ह्यात असलेल्या २५ लाख ४२ हजार ४५० मतदारांपैकी १२ लाख २४ हजार महिला आहेत. महिला मतदारांची मते मिळविण्यासाठी उमेदवार प्रचारादरम्यान थेट घरोघरी पोहोचत आहेत. त्यात ज्येष्ठ महिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी मतदार चरणस्पर्शही करीत आहेत. महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्याची माहिती उमेदवार देत आहेत. तर आणखी नव्या योजना सुरु करण्याचे आश्वासनही महिला मतदारांना उमेदवारांकडून प्रचारादरम्यान दिल्या जात आहे.
नऊ मतदार संघातून आठ जणीच रिंगणातविधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात एकूण आठ महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत. त्यात चार महिला उमेदवार पक्षाकडून तर चार महिला उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सेनेच्या राजश्री पाटील या प्रमुख उमेदवार आहेत. त्याचवेळी दक्षिणमध्ये पंचफुला चंद्रकांत तारु आणि नय्यरजहा महमद फेरोज हुसेन यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. नायगाव मतदारसंघात भारत प्रभात पार्टीकडून वर्षाराणी बाबूराव नामवाड, देगलूर मतदारसंघात बहुजन समाज पक्षाकडून सावित्रीबाई श्रीहरी कांबळे आणि विमल बाबूराव वाघमारे या नॅशनल सोशालिस्ट पार्टी (यु) कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.