नांदेड : जिल्ह्यातील नांदेड उत्तर मतदारसंघात बंड शमविण्यात यश आले असले तरी दक्षिण मतदारसंघात मात्र बंडखोरी कायम आहे. नांदेड दक्षिणमध्ये ६२ पैकी २४ उमेदवारांनी माघार घेतली असून सर्वाधिक ३८ उमेदवार या मतदारसंघात रिंगणात राहिले आहेत.
नांदेड दक्षिण मतदारसंघात भोकरपाठोपाठ सर्वाधिक ६२ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील २४ उमेदवारांनी ७ आॅक्टोबर रोजी माघार घेतली आहे. मात्र बंड करणाऱ्या दिलीप कंदकुर्ते, प्रकाश कौडगे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. या मतदारसंघातून मोहन हंबर्डे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर सेनेच्या उमेदवार राजश्री पाटील रिंगणात आहेत. एमआयएमकडून मोहमद साबेर चाऊस यांचीही उमेदवारी नांदेड दक्षिण मधून कायम आहे. नोंदणीकृत पक्षाचे नऊ उमेदवार नांदेड दक्षिण मतदारसंघात असून त्यात इंडियन युनियन मुस्लिम लीगचे अल्ताफ अहमद, आंबेडकर नॅशनल काँग्रेसचे अ. रईस अहमद, वंचित बहुजन आघाडीचे फारुख अहमद, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब दगडू, बहुजन महापार्टीचे शेख साजीद, एमआयएमचे महमद साबेर चाऊस यांचा समावेश आहे. इतर २८ अपक्ष उमेदवारही या मतदारसंघातून रिंगणात आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून हेमंत पाटील तर भाजपाकडून दिलीप कंदकुर्ते यांच्यात लढत झाली होती़ त्यावेळी कंदकुर्ते हे दुसऱ्या क्रमांकावर होते़ थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता़ जिल्ह्यात नांदेड दक्षिण मतदारसंघात एका मतदान बुथवर तीन ईव्हीएम मशीन लागणार आहेत. नांदेड उत्तरमध्ये दोन ईव्हीएम मशीन लागणार आहेत. जिल्ह्यातील इतर सात मतदारसंघात प्रत्येक बुथवर एका मशीनची गरज लागणार आहे. उत्तर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर मिलिंद देशमुख आणि बंडू पावडे यांनी माघार घेतली आहे़ त्यामुळे या मतदारसंघात आता काँग्रेस, सेना, वंचित आणि एमआयएम अशी चौरंगी लढत पहायला मिळणार आहे़ दोन वेळेस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे डी़ पी़ सावंत यावेळी हॅट्ट्रीक करतात की, मतदारसंघ नवीन चेहऱ्याला संधी देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़ ५६ उमेदवारांपैकी ३२ जणांनी सोमवारी माघार घेतली असून २४ जण रिंगणात आहेत़
नांदेड उत्तर मतदारसंघ हा भाजपाला सोडवून घेण्यात यावा़ यासाठी भाजपाच्या अनेकांनी प्रयत्न केले होते़ परंतु, हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला़ त्यानंतर भाजपातील काही जणांनी सेनेत जावून उमेदवारीसाठी प्रयत्न केले़ परंतु सेनेकडून या ठिकाणी महापालिकेतील एकमेव नगरसेवक बालाजी कल्याणकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली़ तत्पूर्वीच एमआयएमकडून फेरोज लाला आणि वंचित आघाडीकडून मुकुंद चावरे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली होती़ तर काँग्रेसकडून या मतदार संघात तिसऱ्यांदा डी़ पी़ सावंत हे नशीब आजमावत आहेत़ भाजपाकडून मिलिंद देशमुख आणि बंडू पावडे या दोघांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली होती़ त्यामुळे युतीतील हे बंड सेना उमेदवाराला अडचणीत आणणारे ठरले असते़ परंतु, ऐनवेळी मिलिंद देशमुख आणि बंडू पावडे यांनी उमेदवारी मागे घेतली़ त्यामुळे या मतदारसंघात आता सेना, काँग्रेस, वंचित आणि एमआयएम अशी थेट लढत होणार आहे़ छाननीनंतर या मतदारसंघात ५६ जण रिंगणात राहिले होते़ त्यात सोमवारी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३२ जणांनी माघार घेतली असून आता २४ जण रिंगणात आहेत़
दक्षिणमध्ये अपक्षांचे आव्हानजिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक अपक्ष उमेदवार हे नांदेड दक्षिण मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात तब्बल २८ अपक्ष या मतदारसंघात रिंगणात उरले आहेत. त्यामुळे या अपक्षांचा फटका नेमका कोणाला बसेल याकडे लक्ष लागले आहे. अपक्षापैकीच दिलीप कंदकुर्ते हे प्रमुख बंडखोर उमेदवार याच मतदारसंघात आहेत. तसेच शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही सेनेविरोधातच दंड थोपटले आहे.दरम्यान, कौडगे यांनी आपल्या सहसंपर्कप्रमुख पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपविला आहे. कौडगे यांच्या राजीनाम्यासह त्यांच्या समर्थकांनी विविध पदांचे राजीनामे पक्षाकडे सुपूर्द केले आहेत.
वंचित, एमआयएमवर राहणार भिस्तनांदेड उत्तर मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे़ हा मतदार नेहमी काँग्रेसच्या बाजूने राहिला आहे़ परंतु, लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या उदयाने काँग्रेसच्या या पारंपरिक मतपेढीला धक्का पोहोचला होता़ आता डी़पी़सावंत हे तिसऱ्यांदा या मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत़ त्यांच्यापुढे कोरी पाटी असलेले सेनेचे बालाजी कल्याणकर हे आहेत़ तर वंचितकडून मुकुंद चावरे आणि एमआयएमकडून फिरोज लाला हे रिंगणात आहेत़ त्यामुळे वंचित आणि एमआयएमकडून या मतदारसंघात किती ताकद लावली जाते़ त्यावरच निकाल अवलंबून आहे़