कोल्हारी येथे गाव बैठक
किनवट - तालुक्यातील कोल्हारी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गाव बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली. यावेळी रेशीम शेतीचे फायदे, शेती कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला पंचायत समिती उपसभापती कपिल करेवार, सरपंच गोविंद अंकुरवाड, उपसरपंच माधव हराळे, प्रकाश करेवाड उपस्थित होते.
शिवा संघटनेचा पाठिंबा
लोहा - तालुक्यातील रायवाडी येथील नंदी मंदिरात प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष गोविंद वडजे यांनी शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात यावा या मागणीसाठी उपोषण सुरू केले. संबंधितांनी याकडे अद्यापही लक्ष दिले नाही. दरम्यान, शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत लांडगे, गणेश घोडके, व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मानसपुरे, उपाध्यक्ष नवनाथ दगडगावे उपस्थित होते.
सरपंचपदी कनशेट्टे
बिलोली - तालुक्यातील गंजगाव येथील सरपंचपदी सुनीता कनशेट्टे तर उपसरपंचपदी रेखा बावलगावे यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून परमेश्वर देशमुख होते. यावेळी नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. मतदारांनी हणमंतराव कनशेट्टे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सर्व जागा जिंकून दिल्या होत्या.
सेवालाल महाराज जयंती
वाईबाजार - बंजारा समाजाचे आराध्य दैवत सेवालाल महाराज यांची जयंती वाईबाजार येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सेवालाल मंदिर परिसरात प्रा. विलास राठोड, नारायण राठोड, दशरथ जाधव यांनी ध्वजारोहण केले. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विमल मडावी, सीताराम मडावी, कैलास पाटील, नंदू कटकमवार, विष्णू खराते, गोविंद पवार, राजू राठोड, विलास पवार आदी उपस्थित होते.
उपाध्यक्षपदाची २२ रोजी निवड
किनवट - येथील उपनगराध्यक्ष पदाची २२ फेब्रुवारी रोजी निवड होणार आहे. यापूर्वीचे अजय चाडावार यांनी आपला कार्यकाळ संपल्याने पदाचा राजीनामा दिला होता. या पदासाठी भाजपाकडून नगरसेवक व्यंकट नेम्मानीवार यांचे नाव चर्चेला आहे. मात्र आ.भीमराव केराम ठरवतील तोच उमेदवार फायनल होणार आहे.
भुईमुगावर करपा रोग
नायगाव - तालुक्यातील विविध भागातील भुईमुगाचे पीक फळधारणेत आले असतानाच करपा रोगाचा प्रादुर्भाव पिकावर झाला. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी वेगवेगळी किटकनाशके फवारणी करीत आहेत. मात्र फारसा परिणाम होत नाही.
मलिक यांची भेट
लोहा - राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी कंधार येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांच्या कंधार येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी उपसरपंच शिवकुमार भोसीकर, पानभोसीच्या सरपंच राजश्री भोसीकर यांनी मलिक यांचा सत्कार केला.
मन्मथ स्वामींचा जल्लोष
हदगाव - श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांचा जन्मोत्सव हदगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी महाआरती करण्यात आली. कार्यक्रमास उत्तमराव टीकोरे, अंबादास सोनवणे, नारायणराव लामतुरे, मारोतराव चंदापुरे, किशनराव मुखेडी, देविदास टाले, नंदू मुखेडी, नामदेव वाकोडे, सचिन मुळे, शिवकुमार महाजन आदी उपस्थित होते.