महाविकास आघाडी भक्कम; 'त्या' महापालिकांनाही निधी मिळायला हवा अशी भूमिका - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 02:01 PM2020-10-31T14:01:03+5:302020-10-31T14:05:04+5:30
चंद्रकांत पाटील यांनी पाडलेले खड्डे मी बुजवतोय
नांदेड : काँग्रेसच्या महापालिकांना निधी दिला जात नाही असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी परभणी येथे केले होते. या वक्तव्याबाबत मंत्री चव्हाण यांनी आपण तसे म्हणालो नसून त्या महापालिकेलाही निधी मिळायला पाहिजे अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले. तसेच काँग्रेस पक्ष भक्कम आहे. महाविकास आघाडी ५ वर्ष पूर्ण करेल असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
मागच्या सरकारने दिशाहीन काम केले. मराठवाड्यावर अन्याय केला. हे सगळे मागचे खड्डे आहेत. त्या सरकारमधील चंद्रकांत पाटील यांनी पाडलेले हे खडडे मी आता बुजवत आहे असा टोला मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी लगावला.
काय म्हणाले होते अशोक चव्हाण
काँग्रेसच्या महानगरपालिकेला पैसे मिळत नाही अशा तक्रारी आल्या, नांदेडलाही पैसे मिळाले नाहीत, आम्ही मुख्यमंत्र्यांना २-३ वेळा सांगितले, तीन पक्षांचे सरकार आहे, असं असताना आमच्याही महापालिकेला निधी मिळाला पाहिजे. आम्हालाही ताकद मिळाली पाहिजे अशी भावना त्यांनी बोलून दाखवली तसेच निवडणुकीनंतर भाजपाचं सरकार येऊ नये यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला, शिवसेनेची आघाडी करायची की नाही? याबाबत भरपूर चर्चा झाली, सोनिया गांधी आमच्यावर नाराज होत्या. परंतु आमची मते आम्ही पक्षनेतृत्वाकडे मांडली, भाजपाला रोखण्यासाठीच शिवसेनेला पाठिंबा दिला, भाजपाचं सरकार नको, त्यांना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे अशी भूमिका पटवून सांगितले, त्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये आली असंही अशोक चव्हाणांनी सांगितले.