अर्धापूर ( नांदेड ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ( दि. २५ ) देशातील निवडक व्यक्तींसोबत 'मन कि बात' या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याची इच्छा पूर्ण होत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद चे शिक्षक संतोष राऊत यांनी व्यक्त केली आहे. ( teacher from Ardhapur taluka will interact with the PM Narendra Modi )
तालुक्यातील कारवाडी येथील उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत यांचा 'मुलांशी गप्पा' हा ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू आहे. यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी होत कोरोना काळात शाळा बंद असताना अध्ययन करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. विना दप्तराची शाळा, बांधावरील शाळा आदी २८ उपक्रम, मुलांशी गप्पा आदी उपक्रम राबविले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याची संधी मिळू शकते, असा असा मेसेज 'माय गव्हर्मेंट' यांच्याकडून शिक्षक संतोष राऊत यांना दि.१७ रोजी आला. त्यांनी कामाची माहिती 'माय गव्हर्मेंट'कडे पाठवली. २५ जुलै रोजीच्या 'मन की बात' या कार्यक्रमात त्यांना पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद साधता येतील असा मेसेज पंतप्रधान कार्यालयातून आल्याची माहिती राऊत यांनी दिली.
कोरोना काळात ऑनलाइन माध्यमातून गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण देण्याचे संतोष राऊत यांचे कार्य उल्लेखनीय आहे.- रुस्तुम ससाने, गटशिक्षण अधिकारी अर्धापुर