एमसीक्यू प्रश्नपद्धती आता बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:59 AM2019-07-15T00:59:59+5:302019-07-15T01:01:18+5:30
स्वारातीम विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या ठरावानुसार आता पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या एमसीक्यू परीक्षा पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे़
नांदेड : स्वारातीम विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या ठरावानुसार आता पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या एमसीक्यू परीक्षा पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे़ यापुढे बी़ ए़, बी़ एस्सी़, बी़ कॉम़, बी़ बी़ ए़ व इतर अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा ही थिअरी पद्धतीने घेण्यात येणार आहे़
शैक्षणिक वर्ष २०१९- २० मधील प्रथम, तृतीय व पाचव्या सत्रातील नियमित विद्यार्थ्यांची हिवाळ्यातील परीक्षा तसेच नियमित सत्रांची उन्हाळी २०२० ची परीक्षा थिअरी पॅटर्ननुसार होणार आहे़ बी़ ए़ व बी़ एस्सी़ अभ्यासक्रमातील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील ऐच्छिक विषयांच्या दोन्ही पेपरची परीक्षा एकाच दिवशी एकत्रित घेण्यात येणार आहे़
दोन्ही पेपरसाठी तीन तासांचा कालावधी देण्यात येणार आहे़ प्रत्येक पेपरसाठी २० पानांची स्वतंत्र उत्तरपुस्तिका देण्यात येणार आहे़ बी़ ए़ , बी़ एस्सी़, बी़ कॉम़, बी़ बी़ ए़ व इतर अभ्यासक्रमातील सर्व सत्रातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना थिअरी व एमसीक्यू पॅटर्नप्रमाणे परीक्षा देण्यासाठी हिवाळी २०१९ व उन्हाळी २०२० अशा केवळ दोन संधी देण्यात येणार आहेत़ यानंतर अनुत्तीर्ण राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन परीक्षा पद्धतीनुसार केवळ अनुत्तीर्ण विषयाची परीक्षा द्यावी लागणार आहे़
या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेताना सर्व परीक्षा केंद्रप्रमुखांनी बैठक व्यवस्था स्वतंत्र हॉलमध्ये करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ विद्यार्थ्यांना थिअरी पॅटर्नमुळे आता लिहिण्याची सवय लावावी लागणार आहे़
हिवाळी परीक्षेपासून सुरूवात
च्येणाºया हिवाळी परीक्षेपासून नव्या परीक्षा पद्धतीतील बदलानुसार परीक्षा होणार आहेत़ विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांत यापूर्वी एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेतल्या जात होत्या़ मात्र आता विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तरे लिहावी लागणार आहेत़