दुष्काळातही सोहळे, उत्सवावर लाखोंचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:13 AM2019-04-22T01:13:55+5:302019-04-22T01:16:44+5:30
दुष्काळ पडला म्हटले तरी पोटात गोळा उठतो. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. ज्यांनी १९७२ चा दुष्काळ अनुभवला ते आजही झाडपाला खाऊन दिवस काढल्याच्या आठवणी सांगतात.
सुनील चौरे।
हदगाव : दुष्काळ पडला म्हटले तरी पोटात गोळा उठतो. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. ज्यांनी १९७२ चा दुष्काळ अनुभवला ते आजही झाडपाला खाऊन दिवस काढल्याच्या आठवणी सांगतात. परंतु, आता दुष्काळग्रस्त गावांत लग्नाचा सुकाळ झाला असून धार्मिक कार्यक्रम जयंतीवरही लाखोंचा खर्च केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़
तालुक्यात सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाला. यामुळे कोरडवाहू शेतीसह बागायती शेतीतील उत्पन्नाला फटका बसला. कापूस, मूग, उडीद, सोयाबीन याची आणेवारी कमी आल्याने जिल्ह्यात मनाठा मंडळाचा समावेश दुष्काळात झाला. यामुळे २०-२२ गावांचा समावेश आहे. निसर्गाची अवकृपा झाल्याने माणूस हतबल होतो. शेती असा व्यवसाय आहे की, नफ्याची खात्री नाहीच. उपवर झालेल्या मुलीच्या लग्नाचीही चिंता कुटुंबाला असते.
मुलीच्या लग्नासाठी तिच्या जन्मापासून बचत केली जाते. परंतु, सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे फिक्स डिपॉझीट काढण्याची वेळही शेतकऱ्यांवर आली आहे. सुगी चांगली येईल या आशेने शेतकरी शेतीवर खर्च करतो. लहरी पावसामुळे, हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकरीवर्ग कर्जबाजारी होत आहे. अशाच गावात तीन महिन्यांत शेकडो लग्न होत आहेत.
या लग्नात होणा-या खर्चावर कुठेही बारकाई दिसत नाही. फटाके, डेकोरेशन, बँड, स्वयंपाकातील विविध पदार्थ व लग्नाला आमंत्रित होणारे शेकडो नातेवाईक यामुळे खर्च अमाप होतो. यावर उपाय म्हणून सामूहिक विवाह मेळावे घेण्यात येतात. तर कुठे सर्वधर्मीय विवाह मेळावेही घेतले जातात. परंतु आजही सामाजिक दडपणामुळे व अहंकारामुळे अनेक मंडळी कर्जबाजारी होऊन लग्नावर खर्च करतात व शेवटी नैराश्यात येतात.
वाढदिवसाचे बॅनर लावून केला जातो खर्च
- गावात ज्येष्ठ नागरिकांना, निराधारांना पगार नाही. सहाशे रुपये महिना मिळावा यासाठी ही मंडळी एकीकडे पुढाऱ्यांच्या पाठीमागे फिरताना दिसते तर दुसरीकडे हीच पुढारी मंडळी नेत्याच्या वाढदिवसाचे बॅनर काढण्यात दंग झालेले दिसतात. दुष्काळग्रस्त गावांत लग्नाचा सुकाळ पाहिल्यानंतर येथे दुष्काळ नाही. कागदावरच हा दुष्काळ आहे़
- पळसा येथील शेतक-याने शेतातील हरभरा आगीत जळाल्यामुळे मुलीचे ठरलेले लग्न कसे करावे? या विवंचनेतून आत्महत्या केली. २२ गावांतही सध्या पारायण, अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहेत. एका कार्यक्रमासाठी साधारणत: ५० हजार ते १ लक्ष रुपये खर्च होतो़ दुष्काळ पडल्यामुळे निदान त्यावर्षी खर्च करण्यात येऊ नये. परंतु पुढारी ऐकत नाहीत.