नांदेड: मनसेचे जिल्हाप्रमुख संभाजी गोविंदराव जाधव (वय ४७) यांनी तरोडानाका परिसरातील राजेशनगर येथील आपल्या राहत्या घरी मंगळवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. दुष्काळी परिस्थिती आणि त्यामुळे वाढत असलेल्या शेतीकर्जाच्या बोजातून जाधव यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केल्यानंतर आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत राज ठाकरेंसोबत जाणारे संभाजी जाधव हे मराठवाड्यातील पहिले पदाधिकारी होते.
नांदेड शहराजवळील डौर या गावचे रहिवासी असलेले संभाजी जाधव हे विद्यार्थीदशेपासून राज ठाकरे यांच्या संपर्कात होते. विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणूनही जाधव यांनी लक्षवेधी काम केले होते. डौर येथेच त्यांची वडिलोपार्जित जमीन होती. ते स्वत: शहरातील तरोडानाका भागात राहत असत. व्यवसायाने शेतकरी असलेल्या जाधव यांच्या शेतीवरील कर्ज वाढत होते. याच विवंचनेतून मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, पोलीस उपनिरीक्षक एम.एन. दळवे यांच्यासह पोलीस नाईक श्रीरामे, हवालदार केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.