गुन्हे नोंदविण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:38 AM2018-09-26T00:38:34+5:302018-09-26T00:39:01+5:30
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणाला मंगळवारी आज नवे वळण मिळाले़ आरोपी २७ संचालकांच्या पुनर्विलोकन याचिकेवर यापूर्वी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यास चार दिवसांची स्थगिती दिली होती़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणाला मंगळवारी आज नवे वळण मिळाले़ आरोपी २७ संचालकांच्या पुनर्विलोकन याचिकेवर यापूर्वी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यास चार दिवसांची स्थगिती दिली होती़ त्यात मंगळवारी या प्रकरणातील तक्रारदाराने न्यायालयाकडे वेळ मागून घेतला़ त्यानंतर न्यायालयाने गुन्हे दाखल करण्यास १२ आॅक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे़
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००० ते २००३ या काळात नोकरभरती, संगणक खरेदी, इमारत भाडे, नियमबाह्य खरेदी, नियमबाह्य कर्ज वाटप आदी २३ प्रकरणांमध्ये जवळपास साडेपाचशे कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला होता़ लेखापरीक्षणात ही बाब उघडकीस आली होती़ या प्रकरणात सहकारमंत्र्यांनी तत्कालीन २७ संचालकांना क्लीनचिट दिली होती़ दरम्यान, क्रांतिकारी जय हिंद सेनेचे संभाजी पाटील यांनी या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल केली होती़
त्यानंतर न्यायालयाने १० सप्टेंबर रोजी तत्कालीन २७ संचालकांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश काढले होते़ परंतु, न्यायालयाने हे आदेश दहा दिवसानंतर २१ सप्टेंबर रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात पोहोचले़ त्याच दिवशी आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यास चार दिवसांची स्थगिती दिली होती़
या प्रकरणात स्थगितीनंतर मंगळवारी पुन्हा न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली होती़ मंगळवारी मात्र तक्रारदार संभाजी पाटील यांनी न्यायालयात वेळ मागून घेतला़ त्यानंतर न्यायालयाने गुन्हे दाखल करण्यासाठी १२ आॅक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे़ अशी माहिती सरकारी वकील अॅड़नितीन कागणे यांनी दिली़