बनावट बँक गॅरंटी देवून सेवाभावी संस्थेकडून महावितरणची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 06:46 PM2019-07-16T18:46:01+5:302019-07-16T18:47:58+5:30
गडगा येथील आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल
नांदेड : नांदेड शहर विभाग कार्यालयाच्या अंतर्गत गडगा येथील अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला शहरात तीन ठिकाणी वीजबील भरणा केंद्र चालवण्यास देण्यात आले होते. मात्र या संस्थेच्या संचालकांनी महावितरणची फसवणुक करत दहा लक्ष रूपयांची खोटी बँक गॅरंटी तयार करुन ती खरी असल्याचे भासवल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष संजय किशन भांगे व सचीव राजकुमार किशनराव भांगे या दोघांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड शहर उपविभागांतर्गत विद्युत भवन साठे चौक, वजिराबाद व देगलूर नाका येथे वीजबिल भरणा केंद्र डिसेंबर २०१७ मध्ये आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेस चालविण्यास देण्यात आलेले होते. महावितरण सोबत झालेल्या कराराच्या अनुशंगाने सरासरी तीन दिवसाच्या जमा झालेल्या वीजबिलाच्या रक्कमे ऐवढी अतिरिक्त अनामत रक्कम किंवा बँक गँरंटी देणे आवश्यक होते. या संबंधी सदरील संस्थेस कळविण्यात आले होते. सदरील संस्थेने माहे जानेवारी-2019 रोजी महाराष्ट्र ग्रामिण बँक, शाखा गडगा यांचेकडील रुपये दहा लाख एवढया रक्कमेची बँक गॅरंटी महावितरणकडे जमा केली. सदरील संस्थेने मुखेड येथील वीजबिल भरणा केंद्रात वीजग्राहकांनी जमा केलेल्या बिलाच्या रक्कमेचा अपहार केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या अनुशंगाने सदरील संस्थेने देण्यात आलेली बँक गॅरंटी नियमाप्रमाणे वटविण्या करिता संबंधीत महाराष्ट्र ग्रामिण बँक, शाखा गडगा येथे बँक गॅरंटी वटविण्यासाठी सुचित केले असता बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनी सदरील बँक गॅरंटी खोटी व बनावट असल्याचे सांगून आम्ही बँक गॅरंटी दिलीच नाही असे महावितरणला कळविले.
आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय किशन भांगे व सचीव राजकुमार किशनराव भांगे या दोघांनी महावितरणला खोटी व बनावट बँक गॅरंटी देऊन महावितरणची जाणुन बूजून हेतूपुरस्सर फसवणुक केल्या प्रकरणी भा.द.वि. कलम 420, 467, 468, 471 व 34 अन्वये नायगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.