आसना नदीवर महापालिकेकडून बंधारा उभारण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:59+5:302021-06-16T04:24:59+5:30

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. पावसाने ताण दिल्यानंतर विष्णूपुरी प्रकल्पाची पाणीपातळी खालावली जात होती. त्यानंतर पाणीटंचाईला सामोरे जावे ...

Municipal Corporation starts construction of dam on Asana river | आसना नदीवर महापालिकेकडून बंधारा उभारण्याचे काम सुरू

आसना नदीवर महापालिकेकडून बंधारा उभारण्याचे काम सुरू

Next

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. पावसाने ताण दिल्यानंतर विष्णूपुरी प्रकल्पाची पाणीपातळी खालावली जात होती. त्यानंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने १० वर्षांपूर्वी आसना नदीवर पर्यायी पाणीपुरवठा योजना सुरू केली. पैनगंगेचे पाणी घेऊन उत्तर नांदेडला या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या योजनेसाठीही पाणी कमी पडून लागल्याने आसना नदीवर बंधारा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार महापालिकेने आसना नदीवर बंधारा उभारण्याचे काम ८ दिवसांपासून सुरू केले आहे. हे काम महिनाभरात पूर्ण होईल. त्यावर २८ लाख रुपये खर्च केले जात आहेत. हे काम सुरू करण्यासाठी आसना बंधाऱ्यावर या उन्हाळ्यात पाणी साठवता आले नाही. त्याचवेळी बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करता आला नाही. परिणामी, संपूर्ण ताण विष्णूपुरी प्रकल्पावर आला. यंदा प्रकल्पात पाणी उपलब्ध असले तरी पाणी उपसा करण्यासाठीची तांत्रिक क्षमता मनपाकडे नाही. तब्बल २२ वर्षांपूर्वीचे मनपाचे विद्युत पंप पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. त्यात दुरुस्तीचाही प्रश्न वारंवार येत आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प भरल्यानंतरही शहराला तीन दिवसाआड पाणी दिले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रश्नावर नगरसेवकांनीही चुप्पी साधली आहे, हे विशेष.

८ दिवसांत पाणीप्रश्न सुटेल : महापौर

शहरात पाणी उपलब्ध असूनही ३ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे; परंतु आसना नदीवरील बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे यंदा पाणी घेता आले नसल्याचे महापौर मोहिनी येवनकर यांनी सांगितले. नागरिकांमध्ये असलेला असंतोष आपण समजू शकतो. हा प्रश्न ८ दिवसांत निकाली काढण्यात येईल. त्याचवेळी पाणीपुरवठा विभागाची तांत्रिक क्षमता वाढविण्यासाठी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली असल्याचे महापौर येवनकर म्हणाल्या.

आज तातडीची बैठक - अतिरिक्त आयुक्त

शहरातील पाणीपुरवठ्यातील अडचणी जाणून घेण्यासाठी मंगळवारी पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली. पाणी उपलब्ध असतानाही शहराला अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. तांत्रिक क्षमतेबाबतही माहिती घेतली जाणार आहे. यापूर्वी पाणीपुरवठा विभागाकडे अपूर्ण माहिती होती. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत पाणीप्रश्नावर तोडगा काढला जाईल, असेही मनोहरे म्हणाले.

Web Title: Municipal Corporation starts construction of dam on Asana river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.