नांदेड : माजी विरोधी पक्षनेते बाळू खोमणे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या शहर युवा मोर्चा अध्यक्षाविरुद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोमणे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री मातोश्री मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलीपसिंग सोढी आणि माजी विरोधी पक्षनेता बाळू खोमणे हे एकत्र आले होते़ यावेळी रात्री १०.१५ ते १०.३० च्या सुमारास माहेश्वरी भवन ते नवीन पूल रस्ता येथे मातोश्री मंगल कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर खोमणे यांना अडवत सोढी यांनी ‘तू आमच्या कोणत्याही प्रकरणात आडवा येत आहेस’ म्हणून शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.
सोढी यांनी तलवारीने डोक्यात वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार बाळू ऊर्फ महेश खोमणे यांनी दिली. या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक करदोडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.भाजपा पदाधिकारी कार्यालयातील वादाबाबत नूतन महानगराध्यक्ष कारवाई करतील, असे सांगण्यात आले होते. मात्र भाजपातील अंतर्गत वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. भाजपातील नव्या व जुन्या पदाधिकाऱ्यांतील वाद महापालिका निवडणुकांपासूनच सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीतही हा वाद दिसून आला. निकालानंतर तो आता या ना त्या कारणावरुन मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे.