नांदेड : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आचारसंहितेमुळेच महापालिकेची सोमवारी होणारी अर्थसंकल्पीय विशेष सभाही पुढे ढकलावी लागली आहे. आचारसंहितेची तत्काळ अंमलबजावणी करताना महापालिकेने शहरातील बॅनर्स हटविण्यास प्रारंभ केला आहे.महापालिका प्रशासनाने ५ मार्च रोजी कोणतीही करवाढ आणि कोणतीही नवी घोषणा नसलेला २०१९-२० चा ७३२ कोटी ७५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला होता. स्थायी समितीने दोन दिवसांच्या अभ्यासानंतर या अर्थसंकल्पात जवळपास ५० कोटींची नवे कामे सुचवत प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली होती. ११ मार्च रोजी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार होता. यासाठी ११ मार्च रोजी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. १० मार्च रोजी भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा अंमल तत्काळ सुरू झाला. याच बाबीमुळे मनपाची अर्थसंकल्पीय सभा पुढे ढकलण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे.महापालिकेचा २०१८-१९ चा मूळ अर्थसंकल्प ८२२ कोटी ३९ लाखांचा होता. तो सुधारित अर्थसंकल्प ६६७ कोटी ७५ लाखांवर आला आहे. २०१९-२० चा प्रशासकीय अर्थसंकल्प ७३२ कोटी ७५ लाखांचा आहे. १ लाख ४० हजार ८२९ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प होता. सभापती फारुख अली खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या ८ मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत स्थायी समितीने बजेटमध्ये तब्बल ४६ सुधारणा केल्या आहेत़ त्यामध्ये महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच विविध विकासकामांचा समावेश होता. त्यात गुंठेवारी योजना पुन्हा सुरु करणे, पाणीपुरवठा, ड्रेनेज व मालमत्ता विभागाची अभय योजना सुरु करणे, मनपा हद्दीतील सर्व निवासी व अनिवासी मालमत्ता मनपा रेकॉर्डवर आणून करवसुली करणे, नगररचना विभागाच्या कामकाजात गती आणणे, नंदीग्राम मार्केट, महात्मा फुले मार्केट, राजीव गांधी मार्केटची पुनर्निर्मिती करणे, मनपाच्या इतर मोक्याच्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारणे या उत्पन्नवाढीसाठीच्या सुधारणा त्यात नमूद करण्यात आल्या होत्या.आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे आता महापालिकेचा अर्थसंकल्प निवडणुकानंतरच मंजूर होणार आहे. पण त्याचवेळी स्थायी समितीने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली असल्याने प्रशासकीय कारभाराला कोणतीही अडचण येणार नसल्याचे महापालिका सूत्रांनी स्पष्ट केले.आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाई-डोंगरेलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी सायंकाळपासून लागू झाली आहे. जिल्ह्यात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. विविध पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. निवडणुका घोषित होताच रविवारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करत आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केले आहे.पदाधिकाऱ्यांची वाहने काढली
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडे असलेली वाहने आचारसंहिता लागू होताच काढून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या आदेशानुसार जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती पदाधिकाºयांची वाहने तात्काळ काढून घेतली आहेत.
- लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या शक्यतेने महापालिकेचा अर्थसंकल्प मोठ्या गतीने मंजूर करण्याचे प्रयत्न केले जात होते. स्थायी समितीने अवघ्या दोन दिवसांत प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर पुढच्या दोन दिवसांत सर्वसाधारण सभेपुढे हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी आणला जाणार होता. ११ मार्च रोजी दुपारनंतर निवडणुकांची घोषणा होईल, या अंदाजाने मनपाची अर्थसंकल्पीय सभा सकाळी १० वाजताच ठेवण्यात आली होती.