नांदेड शहरात साडेआठ लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:03 AM2018-11-14T00:03:23+5:302018-11-14T00:04:03+5:30
नांदेड : प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू व पानमसाला वाहतूक करणारा महिंद्रा पीकअप टेम्पो इतवारा पोलीस व अन्न व औषध ...
नांदेड : प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू व पानमसाला वाहतूक करणारा महिंद्रा पीकअप टेम्पो इतवारा पोलीस व अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी पकडला़ या टेम्पोमध्ये ३० पोती आढळून आली आहेत़ त्यामध्ये तंबाखू आणि पानमसाला होता़ यावेळी पथकाने जवळपास साडेआठ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे़
जिल्ह्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूची सर्रासपणे विक्री केली जात आहे़ कोणत्याही पानटपरीवर अगदी सहजपणे गुटखा मिळतो़ शासनाची बंदी असली तरी, अंमलबजावणी मात्र होत नसल्याचेच आजपर्यंत दिसून आले़
मंगळवारी देगलूर नाका परिसरात हैदर फंक्शन हॉलच्या समोर महिंद्रा पीकअप क्रमांक (एम.एच. ३७ बी. ३७३) संशयितरित्या उभा असलेला इतवारा पोलिसांना आढळून आला. सहायक पोलीस निरीक्षक रोयलावार यांनी अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेवून या टेम्पोची तपासणी केली असता त्यात गुटखासाठा असल्याचे आढळून आले. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देवून टेम्पो इतवारा ठाण्यात आणण्यात आला. पीकअप टेम्पोतील गुटख्याने भरलेली गोणी बाहेर काढण्यात आली. त्यात ६ बॅगमध्ये सुगंधित तंबाखू तर २४ बॅगमध्ये राजनिवास पानमसाला हा गुटखा आढळून आला. या मालाची किंमत साडेआठ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. याप्रकरणी इतवारा पोलिसांनी शेख मुक्तार शेख युनूस रा. देगलूर नाका यास ताब्यात घेतले आहे. इतवाराचे पोनि़साहेबराव नरवाडे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त टी. सी. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. रोयलावार, अन्नसुरक्षा अधिकारी उमेश कावळे यांच्या पथकाने कारवाई केली.