नांदेड जिल्हा बँकेच्या पाच शाखांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:02 AM2018-06-19T00:02:07+5:302018-06-19T00:02:07+5:30

अनामत रकमा अत्यल्प असणे, व्यवहार कमी असणे या बरोबरच शाखाही तोट्यात चालत असल्याने जिल्हा बँकेने जिल्ह्यातील पाच शाखांना अखेर टाळे ठोकले आहे. या बँकांतील सभासदांना शेजारच्या इतर बँकांशी जोडण्यात आले आहे.

Nanded District Bank's five branches | नांदेड जिल्हा बँकेच्या पाच शाखांना टाळे

नांदेड जिल्हा बँकेच्या पाच शाखांना टाळे

Next
ठळक मुद्देसंचालक मंडळाचा निर्णय: आर्थिक उलाढाल मंदावल्याने कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : अनामत रकमा अत्यल्प असणे, व्यवहार कमी असणे या बरोबरच शाखाही तोट्यात चालत असल्याने जिल्हा बँकेने जिल्ह्यातील पाच शाखांना अखेर टाळे ठोकले आहे. या बँकांतील सभासदांना शेजारच्या इतर बँकांशी जोडण्यात आले आहे.
जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती अलीकडील काही महिन्यांत काहीशी सुधारली असली तरी मागील अनेक वर्षांपासून बँकेची स्थिती नाजूक आहे. त्यामुळेच २९ आॅक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन संचालक मंडळाने कमी उलाढालीसह तोट्यात असणाऱ्या जिल्ह्यातील १५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या शाखा बंद करण्याची कार्यवाही झाली नव्हती. साधारणत: वर्षभराने जिल्हा बँकेने त्यातील ९ शाखा बंद केल्या. त्यानंतर २०१६ मध्ये शेवाळा आणि बारड या २ शाखांचे नजीकच्या जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये विलीनीकरण करण्यात आले. त्यानंतर ५ शाखा बाबतचा विषय ऐरणीवर होता. मात्र या शाखा बंद केल्यास शेतक-यांना त्रास होईल, जिल्हा बँकेच्या या शाखांमधूनच शासनाच्या विविध योजनांचा निधी दिला जात असल्यानेही शाखा बंद करु नये, अशी संचालक मंडळाची भूमिका होती. मात्र बँकेच्या आर्थिक उलाढालीत दिवसेंदिवस घट होत गेल्याने तोटाही वाढत गेला. पर्यायाने या शाखांची स्थिती सुधारत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ८ जून रोजी जिल्ह्यातील मांजरम, कलंबर, बारुळ, उस्माननगर आणि गणेशनगर (नांदेड) या ५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर शाखा बंद केल्याबाबतचे लेखी पत्र जिल्हा अग्रणी बँकेला पाठविण्यात आले असून रिझर्व्ह बँकेलाही याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला आहे. दरम्यान, बँकेने मोठ्या संस्थांकडील वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
---
शेजारच्या शाखेतून होणार व्यवहार
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने तोट्यात चालणाºया ५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या भागातील सभासदांच्या सोयीसाठी या शाखा परिसरातील सभासदांना नजीकच्या शाखेशी जोडून देण्यात आले आहे. कलंबर शाखेतील सभासद सोनखेडशी, बारुळ शाखेचे चिखलीशी, उस्माननगर शाखेचे शिराढोणशी, मांजरम शाखेचे नायगावशी तर गणेशनगर येथील जिल्हा बँकेच्या शाखेचे जिल्हा बँकेच्या नांदेड येथील जिल्हा परिषद शाखेतून व्यवहार होतील, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Nanded District Bank's five branches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.