लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात विघ्नहर्त्या गणरायाला रविवारी भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात निरोप देण्यात आला. आठ घाटांसह जिल्हाभरातील विविध तलाव, नदी, कृत्रिम तलावांमध्ये श्री विसर्जन शांततेत करण्यात आले.नांदेड शहरात तीन हजारांसह नांदेड जिल्ह्यात जवळपास पाच हजार सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली होती. घरगुती गणेश मंडळांची संख्याही मोठी होती. नांदेड शहरातील पासदगाव आणि सांगवी घाटावर श्री विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या कृत्रिम तलावात छोट्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. श्री विसर्जनाच्यावेळी आठ विसर्जन घाटांवर निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. गणेश मंडळाच्या मिरवणुका घाटावर आल्यानंतर अनेक स्वयंसेवक निर्माल्य संकलनासाठी मंडळापुढे जात होते़ हे निर्माल्य संकलन करुन त्याची योग्य विल्हेवाट लावली जात होती़ यात अनेक स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन तरुण, सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता़दुपारी १२ वाजेदरम्यान सुरू झालेल्या मिरवणुका पहाटे ४ पर्यंत चालू होत्या. नावघाटावर पहाटे ४ वाजता शेवटच्या श्रीमूर्तीचे विसर्जन झाले. शहरात आठ घाटांवर श्री विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती़ दुपारपासूनच पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणुका सुरु झाल्या़ या मिरवणुकामध्ये पारंपरिक ढोल, बँड व लहान साऊंडचा वापर करण्यात आला.न्यायालयाच्या आदेशनुसार मिरवणुकामध्ये डीजे लावण्यात आला नव्हता. त्यामुळे तरुणाईच्या उत्साहावर विरजन पडले असले तरी मिरवणुका शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडल्या.जिल्ह्यात जवळपास ३ हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, पोलीस अधीक्षक संजय जाधव, महापालिका आयुक्त लहुराज माळी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील हेही बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते़ जुन्या नांदेडातील अनेक संवेदनशील भागाला त्यांनी भेटी दिल्या़शहरात विसर्जन मिरवणुका शांततेत व सुव्यवस्थेत पार पडाव्या यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह काही भागात ड्रोन कॅमेºयाद्वारेही परिस्थितीवर लक्ष दिले जात होते़महापालिकेचे अधिकारी प्रत्येक घाटावर नियुक्त करण्यात आले होते़ रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरु होत्या़ नावघाट येथे पहाटे ४ वाजता श्रींचे विसर्जन झाले़ शहरातील १५ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन हे नावघाटावर झाले़ विशेष म्हणजे, येथे तीन क्रेन विसर्जनासाठी ठेवण्यात आल्या होत्या़ मोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नावघाटावर रात्री उशिरापर्यंत अनेक मोठ्या मूर्ती या काळेश्वर भागातही वळविण्यात आल्या होत्या़ शहरातील नगीनाघाट येथेही मोठ्या उत्साहात श्री विसर्जन करण्यात आले़ या ठिकाणी विरोधी पक्षनेत्या गुरुप्रितकौर सोडी यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले़शहरात सांगवी आणि पासदगाव येथे श्री विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात आली होती़ या कृत्रिम तलावात मोठ्या प्रमाणात श्रींचे विसर्जन करण्यात आले़नवीन नांदेडातील श्री मूर्तीचे विसर्जन हे नावघाट तसेच काळेश्वर येथे करण्यात आले़ मोठ्या उत्साहात सिडको भागातील विसर्जन मिरवुणका पार पडल्या़ महापालिकेचे उपमहापौर विनय गिरडे, स्थानिक नगरसेवक, मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते़श्री विसर्जनासाठी मनपाने जीवरक्षकांची नियुक्ती केली होती़ जवळपास २०० जीवरक्षक तैनात करण्यात आले होते़ याच जीवरक्षकांनी मंडळाकडील मूर्ती तराफ्याद्वारे विसर्जित केल्या़विसर्जन मिरवणुकादरम्यान, बालगोपाल, तरुण, महिलांसह सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता़ रात्री १२ वाजेपर्यंत तरुणाई रस्त्यावर होती़ त्यानंतर मिरवणुकांतील गर्दी ओसरली़ त्यातच डीजे नसल्याने विसर्जन मिरवणुकांतील उत्साहावर जणू विरजनच पडल्याचे चित्र शहरात दिसून आले़जुन्या नांदेडात मानाच्या गणपतीचे विसर्जनचौफाळा येथील मानाच्या श्री मार्कडेय गणेश मंडळाची आरती करुन शांततेचे प्रतीक असलेले कबुतर हवेत सोडून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, आ़हेमंत पाटील, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, सभागृह नेते सरदार विरेंद्रसिंघ गाडीवाले, उपमहापौर विनय गिरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, प्रकाश मारावार, धोंडू पाटील, आनंद चव्हाण, किशोर स्वामी, प्रल्हाद सुरकुटवार, लक्ष्मीकांत गोणे, मार्कण्डेय गणेश मंडळाचे कार्यवाहक तथा माजी नगरसेवक सतीशसेठ राखेवार, नगरसेवक साबेर चाऊस, पोलीस पाटील शिवशंकर सिरमेवार, सामाजिक कार्यकर्ते उमेश कोकुलवार, धनंजय गुम्मलवार, नंदकुमार गाजूलवार,स.सुरजितसिंघ पुजारी आदी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात विघ्नहर्त्याला उत्साहात निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:35 AM
जिल्ह्यात विघ्नहर्त्या गणरायाला रविवारी भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात निरोप देण्यात आला. आठ घाटांसह जिल्हाभरातील विविध तलाव, नदी, कृत्रिम तलावांमध्ये श्री विसर्जन शांततेत करण्यात आले.
ठळक मुद्देदुपारी निघालेल्या विसर्जन मिरवणुका पहाटे ४ पर्यंत चालल्या