राज्यापेक्षा नांदेड जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 07:04 PM2020-10-31T19:04:07+5:302020-10-31T19:05:22+5:30
अनेक खाजगी अन् शासकीय कोविड सेंटर गुंडाळले
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी, मृत्यूदरात मात्र अपेक्षित घट झाल्याचे दिसून येत नाही. राज्याचा मृत्यूदर २.६३ टक्के असून जिल्ह्याचा मृत्यूदर मात्र २.८४ टक्के आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर यापूर्वी तब्बल पाच टक्क्यांवर पोहोचला होता. त्यावेळी मराठवाड्यात सर्वाधिक मृत्यू दर नांदेडचा होता.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याची संख्या आता शंभरपेक्षा कमी झाली आहे. दररोज साधारणता पन्नास ते साठ रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे अनेक खाजगी आणि शासकीय कोविड केअर सेंटर गुंडाळले आहेत. मृत्यू पावणाऱ्यांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत असले तरी, अपेक्षित प्रमाणात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले नाही. सध्या मृत्यू पावणाऱ्यांमध्ये इतर व्याधीच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
पन्नाशीपुढील मृत्यू पावणारे अधिक
नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ५०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पन्नाशीपुढील अधिक रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर तिशीतील काही जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पन्नाशीपुढील रुग्णांची संख्या जवळपास तीनशेहून अधिक आहे. तर साठी आणि सत्तरीच्या पुढील शंभराहुन अधिक जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. साधारणता कोरोनाचा संसर्ग आणि इतर व्याधी असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यू पावणारे यांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही शरीरातील ऑक्सिजनस्तर अचानक कमी होणे आणि फुफ्फुसात संसर्ग वाढणे. यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेक रुग्णांना व्हेंटीलेटरवर ठेवावे लागले. आरोग्य विभागानेही या अनुषंगाने व्हेंटीलेटरची संख्या वाढविली आहे. त्या मानाने विशीतील तरुण आणि लहान मुले यांना मात्र कोरोनाचा धोका कमी असल्याचेच दिसून आले.
अनेकांनी गुंडाळला गाशा
जिल्ह्यात जून महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. दररोज साधारणता तीनशेहून अधिक रुग्ण सापडत होते. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील खाटा अपुर्या पडत होत्या. त्यातच खाजगी कोविड सेंटरमध्येही खाटा उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे रुग्णांना खाटेसाठी वशिला लावण्याची वेळ येत होती. आता रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे अनेक कोविड सेंटरने आपला गाशा गुंडाळला आहे.
गाफील राहून चालणार नाही- डॅा.भोसीकर
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. गेल्या सात महिन्यांच्या काळात दिवसरात्र डाॅक्टर, कर्मचारी, परिचारिका यांनी न थकता आपली सेवा बजाविली. त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचवू शकलो. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी, गाफील राहून चालणार नाही. जगात काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाबाबत दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी आहे. मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन या बाबींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. आरोग्य यंत्रणा सक्षम असून इंजेक्शन, खाटा यासह सर्व सुविधा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॅा.नीळकंठ भोसीकर यांनी दिली.
जिल्ह्याची परिस्थिती
बरे झालेले - 17822, उपचार चालू - 600, बळी - 507
नांदेड 2.84%, मृत्यूदर डबलिंगचा रेट - दिवस 60
पॉझिटिव्हीटी रेट - 3.31%, कोरोनामुक्ती रेट - 96.74%