नांदेड जिल्ह्यात टंचाईबरोबरच दूषित पाण्याचेही संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:13 AM2019-05-17T00:13:30+5:302019-05-17T00:18:18+5:30

जिल्ह्यातील नागरिक तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत असतानाच आता दूषित पाण्याचे संकटही ग्रामस्थांसमोर उभे आहे. आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ५ हजार ८३२ पाणी नमुन्यांपैकी तब्बल २२७० पाणी नमुने दूषित आढळले असल्याने नागरिकांना आता संभाव्य आजार टाळण्यासाठी पिण्याच्या बाबत दक्षता घ्यावी लागणार आहे.

In Nanded district, there is a crisis of poluted water along with scarcity | नांदेड जिल्ह्यात टंचाईबरोबरच दूषित पाण्याचेही संकट

नांदेड जिल्ह्यात टंचाईबरोबरच दूषित पाण्याचेही संकट

googlenewsNext
ठळक मुद्देचाळीस टक्के पाणी पिण्यास अयोग्य जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील २२७० पाण्याचे नमुने दूषित

विशाल सोनटक्के ।
नांदेड : जिल्ह्यातील नागरिक तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत असतानाच आता दूषित पाण्याचे संकटही ग्रामस्थांसमोर उभे आहे. आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ५ हजार ८३२ पाणी नमुन्यांपैकी तब्बल २२७० पाणी नमुने दूषित आढळले असल्याने नागरिकांना आता संभाव्य आजार टाळण्यासाठी पिण्याच्या बाबत दक्षता घ्यावी लागणार आहे.
यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने प्रमुख धरणांत पाणीसाठ्याचा ठणठणाट आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर विसंबून रहावे लागत आहे. जलस्त्रोतांची पातळी खालावल्याने दूषित पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील १३०९ ग्रामपंचायतींअंतर्गत ५ हजार ८३२ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यातील ३ हजार ३६२ पाणी नमुने पिण्यासाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे. तर तब्बल २२७० पाणी नमुने दूषित आढळले आहेत. हे प्रमाण ४०.३१ टक्के इतके आढळल्याचे आरोग्य विभागाचा अहवाल सांगतो.
दूषित पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वरासारखे आजार वाढण्याची भिती असल्याने नागरिकांनी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आग्रही राहण्याची गरज व्यक्त होत आहे. बहुतांश ठिकाणच्या विहिरींनी तळ गाठल्याने दूषित पाणी आढळून येत आहे. या बरोबरच नळजोडणी खराब असणे, खाजगी पाईपलाईनला गळती असणे, नळांना तोट्या नसणे, नळांभोवती खड्डे असणे तसेच खड्डा करुन त्यात रांजन ठेवणे, या रांजनात पिण्याचे पाणी साठविणे आदी प्रकारांमुळे दूषित पाण्याचे प्रमाण लक्षणीय दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी रांजनाला बाहेरुन शेवाळे येत असल्याने या पाण्याची दुर्गंधीही येत आहे. त्यामुळेच पाणी गाळून घ्यावे, उकळून प्यावे तसेच तुरटी फिरवून स्वच्छ करुन घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे़

दूषित पाण्याच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. साथरोग नियंत्रण व शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाच्या वतीने कृती योजना बनवून तीन राबविण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणेला याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. साथग्रस्त भागात आरोग्यसेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हास्तरावर २ व जिल्ह्यातील १६ तालुक्यांत १८ वैद्यकीय पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
- डॉ. प्रवीण मुंडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी

देगलूर, मुखेड तालुक्यात समस्या गंभीर
जिल्ह्यात टंचाईच्या सर्वाधीक झळा देगलूर आणि मुखेड तालुक्यांना सोसाव्या लागत आहेत. नेमक्या याच दोन तालुक्यांत दूषित पाण्याचे प्रमाण गंभीर आढळून आले आहे. मुखेड तालुक्यात १०१८ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील केवळ २५३ नमुने पॉझिटीव्ह आले असून ७६५ नमुने दूषित आढळले आहेत. दूषित पाण्याचे हे प्रमाण ७५.१५ टक्के एवढे आहे.
किनवट तालुक्यातील ५२.३० टक्के नमुने दूषित आढळले आहेत. माहूर ८.४४, हदगाव १२.४५, हिमायतनगर २८.८५, भोकर ३१.३२, अर्धापूर ५.५६, नांदेड ११.२२, लोहा ३०.८१, मुदखेड २५.५८, कंधार २२.७४, नायगाव ११.३१, बिलोली २२.९२, उमरी ३०.६६ तर धर्माबाद तालुक्यातील २३२ पाणी नमुन्यांची तपासणी केली असता त्यातील २७ म्हणजेच ११.६४ नमुने दूषित आढळले. त्यामुळे ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याबाबत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे़
जिल्हयातील या ७० गावांमध्ये ब्लिचिंग पावडर उपलब्ध नाही
जिल्ह्यातील १३०९ ग्रामपंचायतींपैकी १२३९ ग्रामपंचायतींत ब्लिचिंग पावडरचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरी ७० ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंग पावडर उपलब्ध नसल्याचे पुढे आले आहे. यामध्ये किनवट तालुक्यातील सर्वाधीक १९ ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडर नाही. यात येंदा, मारोव, बोरगा तांडा, पार्डी गाव, टेंभीगाव, बोपतांडा, निराळा, दहेली, पाथरी, वझरा, भिलगाव, पाटोदा, शिंगोडा, जवरला, रायपूरतांडा, कनकी, गोंडजेवली (प्रा. आरोग्य केंद्र शिवणी), गोंडजेवली (प्रा. आ. केंद्र अप्पाराव पेठ) आणि मार्लागुडा या गावांचा समावेश आहे.
माहूर तालुक्यातील असोली आणि कासारपेठ, हदगाव तालुक्यातील नेवरवाडी, ब्रह्मावाडी, एकराळा, उमरी, पांगरी, करमोडी, वडगाव, लोहा आणि बारकवाडी तर हिमायतनगर तालुक्यातील एकंबा, चिंचतांडा, जवळगाव, भोकर तालुक्यातील भोसी, धानोरा, दिवशी बु, महागाव, बटाळा, गारगोटवाडी, हस्सापूर,पोमनाळा, हळदा, बेंद्री, बल्लाळ, पिंपळढव आणि नांदा (एमपी), नांदेड तालुक्यातील काकांडी, मुदखेड तालुक्यातील तिरकसवाडी, कंधार तालुक्यातील येलूर, खंडगाव, घुटेवाडी आणि नंदनवन, देगलूर तालुक्यातील वळद आणि मरतोळी,मुखेड तालुक्यातील मंग्याळ आणि नागरजाब, उमरी तालुक्यातील हुंडा (गप), निमटेक, कावलगुडा बु, हासनी, इज्जतगाव, दुर्गानगर, अस्वलदरी, जामगाव, ढोलउमरी तर धर्माबाद तालुक्यातील हसनाळी, बल्लापूर, पाटोदा बु, पिंपळगाव, राजापूर आणि मोकळी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
जलसुरक्षकास पाणी शुद्धीकरणाचे प्रशिक्षण देणार

  • टंचाई परिस्थितीमुळे दुषीत पाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते़ या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिका-यामार्फत ग्रामपंचायतीने नेमुन दिलेल्या जलसुरक्षकास पाणी शुद्धीकरणाचे तसेच स्वच्छता सर्वेक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे़
  • पाणी नमुने तपासणीसाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातून कमीत कमी दहा नमुने गोळा करण्यात येतील़ यात जोखीमग्रस्त गावातील पाणी नमुन्यांचा प्राधान्याने समावेश असेल़ जिल्हा आरोग्य अधिकारी याकडे विशेष लक्ष देणार असून याचा आढावाही घेण्यात येईल़
  • ग्रामीण भागातील सार्वजनिक पाणी साठ्याच्या साधनांच्या पाहणीनूसार लाल व हिरव्या रंगाचे कार्ड ग्रामपंचायतीना देण्यात येणार आहे़ यासाठी जि़ प़चे मुख्यकार्यकारी अधिकारी समन्वय साधणार असून यासाठी वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी पुढकार घेतील़

Web Title: In Nanded district, there is a crisis of poluted water along with scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.