नांदेडचे महापौर, उपमहापौर होणार आज पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:36 AM2019-05-22T00:36:23+5:302019-05-22T00:37:13+5:30
एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणलेली असतानाच नांदेड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांना काँग्रेसश्रेष्ठींनी राजीनाम्याचे आदेश दिले
नांदेड : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणलेली असतानाच नांदेड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांना काँग्रेसश्रेष्ठींनी राजीनाम्याचे आदेश दिले असून बुधवारी होणाऱ्या पाणीटंचाई संदर्भातील विशेष बैठकीत महापौर शीलाताई भवरे आणि उपमहापौर विनय गिरडे हे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत.
नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शीलाताई किशोर भवरे आणि उपमहापौरपदी विनय गिरडे यांची १ नोव्हेंबर २०१७ रोजी बहुमताने निवड झाली होती. महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. ८१ पैकी ७४ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. महापौरपदाचा कालावधी हा संवैधानिकदृष्ट्या अडीच वर्षांचा असला तरीही काँग्रेसने नांदेडमध्ये महापौरपदाचा कालावधी सव्वा वर्षाचा निश्चित केला होता. त्यानंतर दुसऱ्यांना संधी देण्याचे धोरण त्यामागे होते. त्यानुसार महापौर शीला भवरे यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ उलटला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास दोन महिने जादा कार्यकाळ भवरे यांना उपभोगता आला आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर महापौर बदलाच्या चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र, आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेता हा बदल पुढे ढकलला. महापालिकेची विशेष सभा २२ मे रोजी बोलावण्यात आली आहे. या सभेत महापौर आणि उपमहापौरांना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही पदाधिका-यांचा कार्यकाळ आता संपुष्टात येणार आहे.
अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी नांदेड महापालिकेचे महापौरपद राखीव आहे. उर्वरीत १३ महिन्यांच्या कालावधीसाठी काँग्रेसच्या ज्योती सुभाष रायबोले, दिशा कपिल धबाले, ज्योती कदम, पूजा पवळे या महापौरपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. पण त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना कोणत्या प्रभागातून जादा मतदान होईल त्याच मतदानाच्या आधारावर नवा महापौर निवडला जाईल, असेही सांगितले जात आहे.
नांदेड महापालिकेच्या महापौरपदी पहिल्यांदाच अनुसूचित जाती प्रवर्गातून महिलेला मान मिळाला होता. काँग्रेसने शीला भवरे यांची निवड केली होती. तर उपमहापौरपदाचा मान विनय गिरडे यांना दिला होता.
दरम्यान, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे बी. आर. कदम यांचाही काँग्रेसने ७ मे रोजी तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा घेतला आहे. पक्षातील सर्वांना न्याय मिळावा या हेतूने काँग्रेसने पदाधिकाºयांचा कालावधी निश्चित केला आहे. त्या धोरणानुसारच राजीनामे घेतले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नव्या महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. निकालानंतर जवळपास १५ ते २० दिवसांत नव्या महापौर-उपमहापौरांची निवड होईल, हेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पाणीटंचाईवर होणार चर्चा
शहरात विशेषत: दक्षिण नांदेडात झालेल्या पाणीटंचाईवर चर्चा केली जाणार आहे. पाणीटंचाई निवारणासाठी होणा-या विशेष सर्वसाधारण सभेत शहरातील अनेक भागात वेळी-अवेळी होणारा पाणीपुरवठा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्याचवेळी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र अनेक भागात आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती सदस्य उपस्थित करतील. विष्णूपुरीतील पाणी संपल्यानंतर पर्यायी व्यवस्था काय? हा प्रश्नही कळीचा ठरणार आहे. जून अखेरपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन काय? टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था आदीबाबत चर्चा अपेक्षित आहे.