नांदेड, परभणी, हिंगोलीला अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:45 PM2020-01-03T12:45:33+5:302020-01-03T12:47:59+5:30

या पावसामुळे रबीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उभ्या पिकांवर रोगराई पसरायला सुरुवात झाली आहे.  

Nanded, Parbhani, Hingoli get rains | नांदेड, परभणी, हिंगोलीला अवकाळी पावसाचा फटका

नांदेड, परभणी, हिंगोलीला अवकाळी पावसाचा फटका

Next
ठळक मुद्दे नांदेड शहरासह विविध ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस परभणीत दुसऱ्यांदा अवकाळी हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बरसला

नांदेड/परभणी/हिंगोली : मराठवाड्यातील नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रबीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उभ्या पिकांवर रोगराई पसरायला सुरुवात झाली आहे.  

नांदेड जिल्ह्यातील लोहा, भोकर, किनवट, उमरी आदी भागांत  बुधवारी पाऊस झाला होता.  उमरी येथे ७.६७ मि.मी. तर भोकर तालुक्यात १०.२५ मि.मी. पावसाची नोंद झाली. 

दुसऱ्या दिवशी गुरुवारीही नांदेड शहरासह विविध ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड तालुक्यात ३.५० मि.मी. तर मुदखेड तालुक्यात ५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दोन दिवसांत जिल्ह्यात ३२.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या हरभरा, गहू, तुरीचे पीक शेतात आहे. अवकाळी पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले असून रोगराईमुळे उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. 

परभणीत दुसऱ्यांदा अवकाळी 
परभणी शहरासह परिसरामध्ये गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. आठवडाभरात दुसऱ्यांदा पाऊस झाला. दिवसभर शहरामध्ये ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारासही शहरात पुन्हा एकदा भुरभुर पाऊस सुरू झाला. बदललेल्या वातावरणामुळे आणि अचानक आलेल्या पावसामुळे रबी हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बरसला
हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. हिंगोलीत गुरुवारी सकाळी पंधरा ते वीस मिनिटे चांगल्याच सरी बरसल्या. रात्री नऊ वाजेदरम्यान पुन्हा पाऊस झाला. जिल्ह्यातील नांदापूर, वारंगा फाटा, आडगाव रंजे, डोंगरकडा, कवठा, आखाडा बाळापूर, हयातनगर, दांडेगाव आदी परिसरात हा पाऊस झाला.  

Web Title: Nanded, Parbhani, Hingoli get rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.