लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कृष्णूर येथील मेगा अॅग्रो अनाज कंपनीतील जप्त केलेले धान्य पोलिसांनी पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले असून दोन दिवसांत जवळपास सहा ट्रकमधील धान्याची मोजदाद करण्यात आली होती़ गेल्या महिनाभरापासून धान्याचे हे ट्रक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर असल्यामुळे लाखो रुपयांच्या या धान्याला कोंब फुटले आहे़ त्यात पोत्यातील धान्याचे वजनही कमी भरत असल्याची माहिती हाती आली आहे़मेगा अॅग्रो अनाज कंपनीवर पोलिसांच्या छाप्याला महिना उलटला आहे़ जप्त केलेले धान्य नेमके कुठे आहे? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना पत्र दिले होते़ त्यानंतर पोलिसांनी सोमवारी जप्त केलेले धान्य पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले़ पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ठेवण्यात आलेल्या दहा ट्रकपैकी मंगळवार सायंकाळपर्यंत आठ ट्रक खुपसरवाडी येथील शासकीय गोदामात नेण्यात आले होते़ या ठिकाणी इन कॅमेरा या धान्याची उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्यासह सहा सदस्यीय चौकशी समितीसमोर मोजदाद करण्यात येत आहे़ त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांचाही समावेश आहे़सोमवारी पहिल्या दिवशी तीन ट्रकमधील धान्याची मोजदाद करण्यात आली होती़ त्यानंतर मंगळवारी आणखी तीन ट्रकमधील धान्याची मोजदाद करण्यात येत होती़ विशेष म्हणजे, गेले महिनाभर हे ट्रक मुख्यालयाच्या मैदानावर उघड्यावरच होते़ त्यामुळे गव्हाला ओल लागल्यामुळे कोंब फुटले आहे़ या ट्रकमधील गव्हाच्या अनेक पोत्यांना कोंब फुटल्याचे तपासणीत आढळून आले़तर दुसरीकडे धान्याच्या वजनामध्येही घट झाल्याची माहिती हाती आली आहे़ अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी या धान्याची तपासणी करीत आहेत़ एका ट्रकमध्ये जवळपास तीनशे पोती असल्याचे मोजदाद करताना स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे जप्त केलेली पोती नेमकी किती? जप्त धान्य किती प्रमाणात खराब झाले? हे मोजदाद पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल़ट्रक सुरु करण्यासाठी गाळला घामपोलिसांनी १८ जुलैला कृष्णूरच्या गोदामावर छापा मारुन धान्याचे दहा ट्रक जप्त केले होते़ त्यानंतर हे ट्रक पोलिसांच्याच ताब्यात होते़ गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळापासून हे ट्रक जागचे हलले नसल्यामुळे त्यांच्या बॅटºया पूर्णपणे उतरल्या होत्या़ त्यामुळे हे ट्रक शासकीय गोदामात नेण्यासाठी सुरु करताना कर्मचाºयांना घाम गाळावा लागला़
धान्याचे वितरण प्रतिनिधीमार्फतशासकीय धान्याची वाहतूक करणारा कंत्राटदार राजू पारसेवार सध्या फरार आहे़ त्यांच्या जामिनावर बुधवारी बिलोली न्यायालयात सुनावणी होणार आहे़ त्यामुळे शासकीय धान्य वितरणव्यवस्थेवर कुठलाही परिणाम झाला नसून कंत्राटदाराच्या प्रतिनिधीमार्फत स्वस्त धान्य दुकानापर्यंत नियमितपणे धान्य पाठविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली़