नांदेडात जलदिंड्यांनी वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:56 AM2019-07-15T00:56:08+5:302019-07-15T00:56:29+5:30
माजी केंद्रीय गृहमंत्री, जलसंस्कृतीचे जनक दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त नांदेड शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नांदेड : माजी केंद्रीय गृहमंत्री, जलसंस्कृतीचे जनक दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त नांदेड शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जलदिंड्या, महारक्तदान शिबीर, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ.शंकरराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले. नांदेड शहरातील चार भागांतून निघालेल्या जलदिंड्या नांदेडकरांसाठी आकर्षणाचा विषय ठरल्या होत्या.
सकाळी ९ वाजता धनेगाव येथील डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जावून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ.अमिता चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ. शरद रणपिसे, आ.वसंतराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी समाधीचे दर्शन घेतले.
डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष समितीच्या वतीने वर्कशॉप कॉर्नर, विजयनगर, अण्णाभाऊ साठे चौक, वजिराबाद मुथा चौक या ठिकाणांहून लेझीम पथक, पथनाट्य, चित्रफिती यासह जलदिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. या जलदिंड्यांमधून ‘पाणी हेच जीवन’ हा संदेश देण्यात आला. या जलदिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्याचे सादरीकरण केले. या जलदिंड्यांमध्ये महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर व विजयनगर, सावित्रीबाई माध्यमिक शाळा, सिडको येथील इंदिरा गांधी शाळा, शारदा भवन हायस्कूल, गुजराती हायस्कूल, राष्ट्रमाता विद्यालय यांनी सहभाग नोंदविला. सर्व जलदिंड्यांची सांगता डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या पुतळा परिसरात झाली. काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या महारक्तदान शिबिरात १३५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्ह्यातील विविध भागात वृक्षारोपण करून शंकरराव चव्हाण यांना अभिवादन केले. अभिवादन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, आ.डी.पी.सावंत, माजी खा.सुभाष वानखेडे, आ.शरद रणपिसे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले़ आ़ अमरनाथ राजूरकर यांनी आभार मानले़
महाराष्ट्र निर्मितीच्या लढाईचे नेतृत्व करणार
डॉ.शंकरराव चव्हाण यांचे कार्य मराठवाडा कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी सिंचन क्षेत्रात केलेले कार्य सदैव लक्षात राहणारे आहे. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर पुन्हा एकदा संघर्ष करण्याची वेळ आली असून डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण लढाई करत राहू. या लढाईचे नेतृत्व करण्यास मी तयार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारातून मराठवाड्याच्या विकासासाठी मार्गक्रमण करत राहू, असे यावेळी ते म्हणाले.
डॉ.शंकरराव चव्हाण यांनी केवळ मराठवाड्याच नव्हे, तर विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले. त्यांच्या संकल्पनेतून उभारलेली धरणे आज महाराष्ट्राची तहान भागवित आहेत, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अभिवादन सभेत केले.