नांदेड जिल्हा परिषद, महसूल विभाग लाचखोरीत सर्वात पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:27 AM2018-12-07T00:27:26+5:302018-12-07T00:30:16+5:30

लाचखोरी विरोधात सर्वसामान्य नागरिक आता तक्रारी करण्यासाठी पुढे येत आहेत. मागील ११ महिन्यात नांदेड विभागातील चार जिल्ह्यात लाचखोरी संदर्भात ७९ गुन्हे दाखल झाले आहेत. यात जिल्हा परिषद आणि महसूल विभाग सर्वात अग्रभागी आहे.

Nanded Zilla Parishad, revenue department at the forefront of the bribe | नांदेड जिल्हा परिषद, महसूल विभाग लाचखोरीत सर्वात पुढे

नांदेड जिल्हा परिषद, महसूल विभाग लाचखोरीत सर्वात पुढे

Next
ठळक मुद्दे७९ गुन्हे दाखल शिक्षेचे प्रमाण अवघे २५ टक्क्यांवरच

नांदेड : लाचखोरी विरोधात सर्वसामान्य नागरिक आता तक्रारी करण्यासाठी पुढे येत आहेत. मागील ११ महिन्यात नांदेड विभागातील चार जिल्ह्यात लाचखोरी संदर्भात ७९ गुन्हे दाखल झाले आहेत. यात जिल्हा परिषद आणि महसूल विभाग सर्वात अग्रभागी आहे. दरम्यान, गुन्ह्याचे प्रमाण वाढत असले तरी त्या प्रमाणात लाचखोरांना शिक्षा होत नसल्याचे विदारक वास्तव आहे. गुन्हे दाखल झालेल्यांपैकी अवघ्या २५ टक्के जणांनाच या गुन्हे अंतर्गत शिक्षा झालेली आहे.
भ्रष्टाचाराविरोधात सर्वव्यापी जनजागरण सुरू आहे. या अनुषंगाने शासकीय कामकाजासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मागितल्या जाणा-या चिरीमिरी विरोधात नागरिक आता तक्रारीसाठी पुढाकार घेवू लागले आहेत. नांदेड विभागातून नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यात मागील ११ महिन्यात विविध अधिकारी, कर्मचा-यां विरोधात तब्बल ७९ गुन्हे दाखल झाले आहेत.
यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २४, हिंगोली-२०, लातूर-१९ तर परभणी जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये १६ जणाविरुद्ध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सर्वसाधारणपणे शासकीय सर्वच विभागातील कर्मचा-याविरुद्ध या कलमाखाली गुन्हे दाखल झाले असले तरी जिल्हा परिषद आणि त्या पाठोपाठ महसूल विभाग लाचखोरीत पुढे असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. तब्बल २२ गुन्हे हे जिल्हा परिषदेशी संबंधित अधिकारी, कर्मचा-याविरुद्ध दाखल झाले आहेत. तर त्या पाठोपाठ महसूल विभाग आहे. या विभागातील अधिकारी, कर्मचा-या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये १६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कायदा ज्यांच्या हातात आहे ते पोलिसही लाचखोरीत मागे राहिलेले नाहीत. १४ पोलीस अधिकारी, कर्मचा-याविरुद्ध या कलमान्वये गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद, महसूल आणि पोलिस या तीन विभागाशी निगडीत अधिकारी, कर्मचारीच ७९ पैकी ५२ गुन्ह्यात सापडले आहेत. तर २७ प्रकरणे इतर विभागाशी संबंधित आहेत.
दरम्यान, २०१७ या वर्षात नांदेड विभागात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये ९५ गुन्हे दाखल झाले होते. या संदर्भात या विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाठकर म्हणाले की, लाचखोरी विरोधात सर्वसामान्यांनी पुढे यावे, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागरण करण्यात येत आहे. लाच घेणे आणि देणेही गुन्हा आहे. याचे भान आता सर्वांनाच येवू लागल्याने तक्रारींचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळेच विभागात दररोज कुठे ना कुठे लाचखोरी विरोधात तक्रार दाखल होताना दिसून येते. सर्वसामान्य नागरिकांनीही आता या विरोधात पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
तक्रारदारांमुळे सुटतात आरोपी
लाचेविरोधात नागरिक आता पुढे येत आहेत. त्यामुळेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल होणा-या गुन्ह्यांचे प्रमाण सगळीकडेच वाढल्याचे दिसते. मात्र असे असले तरी या कलमान्वये आरोपींना मिळणा-या शिक्षेचे प्रमाण अवघे २५ टक्के आहे. लाचखोरी संदर्भातील तक्रार मिळाल्यानंतर तक्रारीचीही खातरजमा केली जाते. आणि त्यानंतरच आरोपीला पकडले जाते. मात्र खटला अनेक वर्ष चालत राहतो. या कालावधीत तक्रारदार आणि आरोपीमध्ये समेट होतो. याचा परिणाम निकालावर होतो.

Web Title: Nanded Zilla Parishad, revenue department at the forefront of the bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.