नांदेड : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आपल्या मागण्यांसाठी गेल्या सोळा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे़ या आंदोलनाची अद्याप कुठलीच दखल न घेतल्यामुळे शुक्रवारी कोतलवांनी भीक मागो आंदोलन करुन शासनाचा निषेध नोंदविला़राज्यातील १२ हजार ६३७ कोतवालांना वर्ग ४ चा दर्जा देणे व इतर मागण्यांसाठी १९ डिसेंबरपासून आंदोलन सुरु करण्यात आले आहे़ नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोरही संघटनेचे धरणे आंदोलन सुरु आहे़ परंतु, अद्यापही प्रशासनाने कोतवालांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही़ त्यामुळे शुक्रवारी कोतवालांनी भीक मांगो आंदोलन केले़५ जानेवारीला कोतवालांच्या वतीने ‘गाजर दाखवा’ आंदोलन करण्यात येणार आहे़ ७ जानेवारीला थाळीनाद, ८ जानेवारीला दवंडी, ९ रोजी मुंडण व त्यानंतर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे़ यापुढे आंदोलनाची धार तीव्र करण्यात येणार आहे़ वर्ग ४ चा दर्जा देणे आणि पटवारी पदावर पदोन्नतीसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुुरु आहे़ यावेळी अध्यक्ष सुधाकर डोईवाड, दिलीप येमेकर, शंकर टोम्पे, शुभम हिंगमिरे, विश्वनाथ पनेरकर, राजीव गुत्तापल्ले यांची उपस्थिती होती़
नांदेडात कोतवालांचे भीक मागो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 1:11 AM