नांदेडकरांना तीन दिवसांआड पाणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:57 PM2019-03-09T23:57:14+5:302019-03-09T23:57:59+5:30

विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रकल्प परिसरातील विद्युत रोहित्र बंद करण्याबाबत महावितरणला वारंवार कळवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शहरावर मे महिन्यानंतर जलसंकट उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे.

Nandedkar water for three days? | नांदेडकरांना तीन दिवसांआड पाणी ?

नांदेडकरांना तीन दिवसांआड पाणी ?

Next
ठळक मुद्देमहावितरणला मनपाचे आणखी एक पत्र

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रकल्प परिसरातील विद्युत रोहित्र बंद करण्याबाबत महावितरणला वारंवार कळवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शहरावर मे महिन्यानंतर जलसंकट उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिकेने आता शहरवासीयांना तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची तयारी केली आहे.
विष्णूपुुरी प्रकल्पात सध्या २४.५१ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून तो मे अखेरपर्यंत पुरण्याची शक्यता आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या विष्णूपुरीतून प्रतिदिन ०.४१ दलघमी पाण्याचा उपसा होत आहे. याच वेगाने पाणी उपसा सुरु राहिल्यास मे अखेरपर्यंत विष्णूपुरी प्रकल्प कोरडा होईल, अशी शक्यता आहे.
दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाने प्रकल्पातून अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांनी गाशा गुंंडाळला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली होती. त्या चर्चेत पथकांचा विषय आला होता. ही पथके कार्यान्वित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला विनंती केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र अद्यापही ही पथके कार्यान्वित झाली नाहीत. त्यामुळे उपसा सुरुच आहे.
दुसरीकडे महावितरणनेही प्रकल्प परिसरात असलेले विद्युत रोहित्र बंद करण्याच्या कारवाईबाबत ‘हात’ वर केले आहेत. महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच महावितरणला आणखी एक पत्र लिहून सदर भागातील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी विद्युत रोहित्र बंद करण्याबाबत कारवाई करावी, असे कळविले आहे.
जिल्ह्यात लहान-मोठे १०६ प्रकल्प आहेत. त्यात मानार, विष्णूपुरी या दोन मोठ्या प्रकल्पांसह ९ मध्यम प्रकल्प, ३ उच्च पातळी बंधारे, ८८ लघु प्रकल्प, ४ कोल्हापुरी बंधाऱ्यांचा समावेश आहे. मानार प्रकल्पाची साठवणक्षमता १४६.९२ दलघमी असून उपयुक्त साठा १३८.२१ दलघमी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात केवळ ३४ दलघमी पाणी उरले आहे. नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पाची साठवणक्षमता ८३.५ दलघमी असून ८०.७९ दलघमी साठा उपयुक्त आहे. सध्या विष्णूपुरी प्रकल्पात २४.९ दलघमी वापरायोग्य पाणी उरले आहे. जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पात १७९.९८ दलघमी पाणी साठवता येते. या प्रकल्पात आजघडीला केवळ १३.९० दलघमी पाणी शिल्लक आहे. ही आकडेवारी पाहता मध्यम प्रकल्प गाळात रुतले म्हटल्यास वावगे ठणार नाही. गोदावरी नदीवरील ३ उच्च बंधाºयात १२१.७० दलघमी पाणी साठवण्याची क्षमता आहे. सध्या या बंधाºयात २०.६ दलघमी पाणी आहे. लहान-मोठ्या ८८ लघू प्रकल्पांची साठवणक्षमता २१६.४५ दलघमी असून उपयुक्त पाणीपातळी १९१.६ आहे. विविध लघु प्रकल्पात सध्या २८.६७ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. ४ कोल्हापुरी बंधाऱ्यांची साठवणक्षमता ६.८२ दलघमी असून एकाही प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही.
सोमवारी महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा
सोमवारी महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा होणार आहे. या सभेत पाणीप्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे प्रशासनाकडून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची तयारी केली जात आहे. त्याचवेळी महापालिकेला इतर विभागाकडून मात्र असहकार्य होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा फटका शहरवासीयांना मे नंतर बसू शकतो. विशेष म्हणजे, पर्यायी पाणी उपलब्ध करणेही यावर्षी अशक्य आहे. येलदरी, सिद्धेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. दिग्रस बंधा-यातूनही यापूर्वीच विष्णूपुरीत पाणी घेण्यात आल्याने पाणी आणायचे कुठून ? हा प्रश्न आहे.

Web Title: Nandedkar water for three days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.