भोकरला साकारतेय निसर्ग पर्यटनस्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:10 AM2019-03-14T00:10:57+5:302019-03-14T00:11:38+5:30
शहरवासीयांनी कित्येक वर्षांपासून पाहिलेले उद्यानाचे स्वप्न पालिकेला पूर्ण करता आले नसले तरी आता येथील नैसर्गिक वातावरणाचा लाभ घेत वनविभागाने सर्वसमावेशक निसर्ग पर्यटनस्थळ निर्मितीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे उद्यानपूर्तीचे सप्न साकार होत असून आतापासूनच चिमुकल्यांच्या हिंदोळ्याने उजाड रान बहरले आहे.
भोकर : शहरवासीयांनी कित्येक वर्षांपासून पाहिलेले उद्यानाचे स्वप्न पालिकेला पूर्ण करता आले नसले तरी आता येथील नैसर्गिक वातावरणाचा लाभ घेत वनविभागाने सर्वसमावेशक निसर्ग पर्यटनस्थळ निर्मितीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे उद्यानपूर्तीचे सप्न साकार होत असून आतापासूनच चिमुकल्यांच्या हिंदोळ्याने उजाड रान बहरले आहे.
भोकर शहरापासून २ किमी अंतरावरील नांदेड मार्गावरील नारवट शिवारात असलेल्या महादेव मंदिर परिसरात लाभलेल्या नैसर्गिक रचनेला उपयोगात आणून जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे व वनकर्मचारी आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या व्यवस्थापनामार्फत निसर्ग पर्यटनस्थळ निर्माण होत आहे.
याठिकाणी असलेले मंदिर, लघु तलाव व डोंगर यांच्या सान्निध्यात सोळाशे हेक्टर क्षेत्रात होत असलेले निसर्ग पर्यटनस्थळ निर्मितीचे काम सन २०१८ मध्ये हाती घेण्यात आले. तीन टप्प्यांत होणाऱ्या कामाचा पहिला टप्पा ७० लक्ष रुपये खर्चातूून पूर्ण झाला असून पुढील काम प्रगती- पथावर आहे. या ठिकाणी आतापर्यंत तलावातील गाळ काढण्यात आला आहे.
लहान मुलांसाठी हिरवळीचे मैदान (लॉन), विविध खेळण्यांचा समावेश आहे, तर मोठ्यांसाठी कवायतीची साधने उपलब्ध केली आहेत. याशिवाय २७ नक्षत्रांप्रमाणे ५४ प्रकारच्या वनस्पतींची लागवड केली आहे. यासोबतच वन्यप्राणी, पक्षी, शेतकरी, जवान असे आकर्षक देखावे तयार करून निसर्गसौंदर्यात भर घातली आहे.
आगामी काळात कमान, पूल, आयुर्वेदिक औषधी रोपवाटिका, कंपाऊंड, ३ कि.मी. चे ट्रेकींग, अल्पोपाहारगृह होणार असल्याने हे ठिकाण पर्यटकांसाठी व शहरवासीयांना निसर्गाच्या सान्निध्याचा भरपूर आनंद देणार आहे. सध्या शहरातील नागरिक आपल्या बाळ -गोपाळासह सुटीचा व निसर्ग सानिध्यात खेळ व मनोरंजनाचा आनंद लुटण्यास गर्दी करीत आहेत.
उद्यान निर्मितीसाठी नगर परिषद उदासीन
तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहराला उद्यानाची अत्यंत आवश्यकता असली तरी मागील १० वर्षांर्पूर्वी अस्तित्वात आलेल्या नगर परिषदेने उद्याननिर्मितीत उदासीनता दाखविल्यामुळे शहरवासीयांना अद्याप विसाव्यासाठी व चिमुकल्यांना बागडण्याकरिता हक्काचे एखादे ठिकाण निर्माण होवू शकले नाही. यामुळे एवढ्या मोठ्या शहरातील बालक, वृद्ध व कामातून थोडी विश्रांती घेवू इच्छिणाऱ्या नागरिकांना उद्यानाच्या उपयोगीतेपासून उपेक्षित रहावे लागत आहे. शहरातील ऐतिहासिक दत्तगडावर एखादे उद्यान व्हावे, अशी शहरवासीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. तर शहराच्या विविध प्रभागांत चिमुकल्यांसाठी खेळाचे व विसाव्याचे ठिकाण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उद्यानाच्या अभावाने लहान बालक व विद्यार्थी तासन्तास घरातच दूरचित्रवाणीसमोर आपला जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत.