कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या साहित्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:33 AM2019-03-20T00:33:19+5:302019-03-20T00:33:47+5:30

बालसाहित्यिकांनी आऊट आॅफ दी बॉक्स विचार करण्याची आवश्यकता असून बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या साहित्याची वर्तमानात गरज आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजीव तांबे यांनी ‘बालसाहित्य - सद्य:स्थिती आणि भवितव्य’ या चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी केले.

The need for material that drives the imagination | कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या साहित्याची गरज

कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या साहित्याची गरज

Next
ठळक मुद्देबालसाहित्य चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी राजीव तांबे यांचे प्रतिपादन

नांदेड : बालसाहित्यिकांनी आऊट आॅफ दी बॉक्स विचार करण्याची आवश्यकता असून बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या साहित्याची वर्तमानात गरज आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजीव तांबे यांनी ‘बालसाहित्य - सद्य:स्थिती आणि भवितव्य’ या चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवानिमित्त भाषा, वाड.्मय आणि संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने ‘बालसाहित्य’ या विषयावर दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्राचा समारोप राजीव तांबे यांनी केला. अध्यक्षस्थानी डॉ. केशव सखाराम देशमुख होते. डॉ. वैजयंता पाटील, डॉ. एम. के. पाटील, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. पृथ्वीराज तौर यांची यावेळी उपस्थिती होती.
शिशुगटासाठी शब्दरहित पुस्तकांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याचेही तांबे यावेळी म्हणाले. बालकांना गोष्टी वाचून दाखवणे आणि गोष्टी सांगणे यातून बालकाचे शिक्षण होत असते. बालसाहित्याचे प्रयोजन मुलांना दृष्टी देणे, आनंद देणे, विविध संकल्पनांबाबतच्या कक्षा रुंदावत नेणे हा असतो. बालसाहित्याचा पाया मुलांवरचा अपार विश्वास आणि निरपेक्ष प्रेम हा आहे, असेही राजीव तांबे आपल्या विवेचनात म्हणाले.
‘बालसाहित्य : सद्य:स्थिती आणि भवितव्य’ या दोन दिवसांच्या चर्चासत्रात नामदेव माळी, माधुरी पुरंदरे, सुभाष विभुते, विद्या सुर्वे, सुरेश सावंत, प्राचार्य रावसाहेब जाधव, जगदीश कदम, देवीदास फुलारी यांच्या अध्यक्षतेखालील आठ सत्रांमध्ये पंचेचाळीस शोधनिबंध सादर करण्यात आले.
बालसाहित्याच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक आणि बालसाहित्यिक यांची चर्चासत्राला लक्षणीय उपस्थिती होती. प्रशांत गौतम, किरण केंद्रे, सुनीता बोर्डे, फारुक काझी, माया धुप्पड, श्रीनिवास बाळकृष्णन, शिवाजी आंबुलगेकर, नरेंद्र्र लांजेवार, अनिरुद्ध गोगटे, माधव चुकेवाड या बालसाहित्यिकांसह हमीद अशरफ, मुहमद मकबूल अहमद, गिरीश जकापुरे, नाथा चितळे स्वाती काटे, संजय जोशी, आनंदी विकास, दिलीप चव्हाण, सत्यकाम पाठक, दीपा बियाणी, सुचिता पाटील, अर्चना डावरे, नीना गोगटे, पी. विठ्ठल, योगिनी सातारकर, झिशान अली, विठ्ठल जाधव, सविदा गोविंदवार आदी अभ्यासकांनी विषयांची मांडणी केली.
चर्चासत्रात एम. ए. मराठीच्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले, भोपाळ येथील सुशील शुक्ल, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका माधुरी पुरंदरे, डॉ. रमजान मुलानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. माया दिलीप धुप्पड, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. सुरेश कदम यांच्या पुस्तकाचे आणि फुलोरा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्तपुस्तिकेचे राजीव तांबे, माधुरी पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Web Title: The need for material that drives the imagination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.