कॉंग्रेसकडून नांदेड दक्षिणमध्ये नवा चेहरा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 04:25 PM2019-10-02T16:25:15+5:302019-10-02T16:27:35+5:30

बदलत्या राजकीय परिस्थितीत चर्चा 

New face of Congress in Nanded South Vidhan Sabha ? | कॉंग्रेसकडून नांदेड दक्षिणमध्ये नवा चेहरा ?

कॉंग्रेसकडून नांदेड दक्षिणमध्ये नवा चेहरा ?

Next
ठळक मुद्देमुस्लीम उमेदवारावर चर्चा काँग्रेसमध्ये लवकरच इनकमिंगही होणार

नांदेड : बदलत्या राजकीय परिस्थितीत नांदेड दक्षिणमध्ये कोणता उमेदवार योग्य राहील यावर सोमवारी काँग्रेसमध्ये चर्चा  झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत शहरातील आयटीएम येथे महापालिकेतील नगरसेवकांची बैठक घेऊन नांदेड दक्षिणच्या उमेदवाराबाबत मते जाणून घेण्यात आली.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत भोकरसह नांदेड उत्तर, नायगाव आणि देगलूर मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा काँग्रेसने केली आहे. दुसरीकडे नांदेड दक्षिणसह हदगाव आणि मुखेड या तीन मतदारसंघांतील काँग्रेसचे उमेदवार अद्याप निश्चित झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर आयटीएम महाविद्यालयात नांदेड दक्षिण मतदारसंघातील उमेदवाराबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी महापालिकेतील नगरसेवकांना पाचारण करण्यात आले होते. नगरसेवकांची नांदेड दक्षिणबाबत मते विचारात घेण्यात आली.

नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसकडून माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर विनय गिरडे यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला, साबेर चाऊस यांच्यासह नरेंद्र चव्हाण हेही इच्छुक आहेत. बदलत्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर कोणता उमेदवार योग्य राहील, मुस्लिम उमेदवार या मतदारसंघात दिला तर नेमके काय चित्र राहील, यावरही चर्चा करण्यात आली. नगरसेवकांनी आपली मते स्पष्टपणे मांडली तर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनीही यासंदर्भात काही सूचना केल्या. उमेदवाराबाबत अंतिम निर्णय मात्र अद्याप राखीवच ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी काँग्रेसमध्ये लवकरच इनकमिंगही होणार असल्याचे चित्र दिसत आहे. हे कोण याकडेही लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून एखादेवेळी नवीन चेहराही दिसू शकतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 


कॉग्रेस आघाडीची आज मुंबईत बैठक
कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप महाआघाडीची बैठक बुधवारी मुंबईमध्ये होणार आहे. या बैठकीनंतरच काँग्रेसच्या उर्वरित आणि राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा होणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीला कंधार-लोहा आणि किनवट मतदारसंघ आघाडीत सुटला आहे. या ठिकाणी किनवटहून प्रदीप नाईक हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर कंधार-लोहा मतदारसंघात माजी आ. शंकरअण्णा धोंडगे किंवा त्यांचे पुत्र दिलीप धोंडगे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळू शकते. याबाबतचा निर्णय बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर होईल. 

Web Title: New face of Congress in Nanded South Vidhan Sabha ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.